ईद ए मिलादची सुट्टी १६ ऐवजी १८ला तर अमळनेरात १९ रोजी मुस्लिम समाजाचा जुलूस
दोन्ही धर्मात शांतता रहावी म्हणून प्रशासन व मुस्लीम धर्मियांचा निर्णय
अमळनेर : दिनांक १६ सप्टेंबर रोजी हिंदू धर्मियांचा गणेश विसर्जन व मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. हिंदू व मुस्लिम धर्मियांचे हे दोन्ही सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे होत असतात. हिंदू धर्मीयांकडून मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका होत असतात तर मुस्लिम धर्मियांचे देखील उरूस मोठ्या प्रमाणावर निघतात. यावेळी कुठलीही शांतता भंग होऊ नये, राज्यात शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी राज्य शासन व मुस्लिम धर्मियांनी एक उत्तम निर्णय घेतला आहे. यानुसार मुस्लिम धर्मीयांसाठी ईद ए मिलादची सुट्टी ही १६ ऐवजी १८ रोजी जाहीर करण्यात आली आहे.
तर अमळनेर शहरात मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद ह्या सणा निमित्त १६ ऐवजी १९ रोजी जुलुस काढला जाणार आहे, अशी माहिती मुस्लिम समाजाचे नेते नासिर हाजी यांनी दिली आहे.
शुक्रवारी या बाबत मुस्लिम समाजासोबत बैठक झाली, हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम समाजाने घेतला आहे. बैठकीत अमळनेर मधील मुस्लिम समाज बांधवांनी देखील ही सामंजस्याची भूमिका घेतली आहे. ही बाब चांगली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. अशा निर्णयांनी समाजाला फायला होतो.
सुनील नंदवाळकर
उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर
अमळनेर शहरात शांतता रहावी व हिंदू / मुस्लिम या दोन्ही समाजात भाईचारा असावा यासाठी १६ ऐवजी १९ रोजी आम्ही आमच्या समाजाचा ईद ए मिलाद निमित्त उरूस काढणार आहोत, आमच्या ईदगाह मुस्लिम कब्रस्थान ट्रस्टच्या सर्व सभासदांनी व अमळनेर शहरातील सर्व मुस्लिम समाजाने हा निर्णय घेतला आहे. हा उरूस डीजे किंवा कुठलेली वाद्य न लावता शांततेने निघणार आहे.
नासीर हाजी
सामाजिक कार्यकर्ते, अमळनेर