अमळनेर रेल्वे पोलिसांवर चाकू हल्ला…
एक आरपीएफ शिपाई जखमी तर एक थोडक्यात बचावला
अमळनेर : रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दुपारी रेल्वे पोलिसांवरच चाकु हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक आरपीएफ शिपाई जखमी झाला असून एक थोडक्यात बचावला आहे. या घटनेने रेल्वे व लोहमार्ग पोलिसांच्या वरिष्ठांनी तात्काळ घटना स्थळाला भेट देऊन चौकशी केली आहे. तर घटनेतील तिन्ही आरोपींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 जवळ गुरुवारी भांडण होत होते, ते भांडण सोडवण्यासाठी हरेंद्रकुमार नामक शिपाई त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाने त्या ठिकाणी गेला. भांडण सोडवतांना तेथील शिवाजी शिंदे, शुभम पाटील व राहुल पाटील यांचा हरेंद्रकुमार यांच्यासोबत वाद होऊनही आधीचे सुरू असलेले भांडण शिपाई हरेंद्रकुमार याने सोडवले, हरेंद्रकुमार तेथून पोलीस चौकीकडे जात असताना त्याला तेथील दोघे – तिघांनी धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. आणि त्या धमकी नुसार काल शुक्रवारी शिवाजी, राहुल व शुभम हे तिघे चाकू घेऊन रेल्वे पोलीस फोर्सच्या चौकीकडे येत चौकीत असलेल्या शिपाई अर्जुनसिंग व हरेंद्र यांच्यावर हल्ला चढवला यात अर्जुनसिंग याने लावलेल्या बेल्ट मुळे तो थोड्यात बचावला मात्र हरेंद्रकुमारच्या अंगावर काही ठिकाणी चाकूचा घाव लागला असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान घटनास्थळी तात्काळ आरपीएफ व जीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून शिवाजी सुधाकर शिंदे, राहुल पंढरीनाथ पाटील, शुभम आनंदा पाटील या तिन्ही आरिपींना रेल्वे पोलीसांनी ताब्यात आहे तर शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पुढील कारवाई सुरू होती.