काँग्रेसमध्ये विधानसभेआधीच इच्छुक उमेदवारांमध्ये गटबाजी…

0

एका गटाची पत्रकार परिषद… डॉ. शिंदे व प्रा. सुभाष पाटील यांच्यावर टीका

तर 5 रोजी जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बूथ मेळावा होणार असल्याचीही दिली माहिती

 

अमळनेर : तालुका काँग्रेसचा दिनांक 5 सप्टेंबर रोजी बूथ मेळावा संपन्न होणार असून यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचा अमळनेर मतदारसंघ हा पारंपरिक असून त्यासाठी आम्ही उमेदवारी घेण्यासाठी आग्रही आहोत असा सूर यावेळी उपस्थित इच्छुक व काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून निघाला. मात्र कॉग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये विधनसभेआधीच गट पडल्याचे दिसून आले, डॉ. अनिल शिंदे व प्रा. सुभाष पाटील आमच्या पक्षाचा प्रोटोकॉल पाळत नाहीत यांसह विविध टीका त्यांनी यावेळी केल्या.

अमळनेर मतदार संघाचा बूथ मेळावा व अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही असून त्यासाठी सोमवार 2 रोजी काँग्रेसकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सुर्यवंशी यांनी सांगितले की येत्या 5 सप्टेंबर ला काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली बूथ मेळावा घेण्यात येणार असून सर्व बूथ प्रमुख व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले की, अमळनेर हा काँग्रेसचाच पारंपारिक मतदारसंघ आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या विनंतीला मान देऊन व आमच्या सक्षम उमेदवार नसल्याने तात्पुरते ही जागा त्यांना दिली होती. आता आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे तालुक्यातून तब्बल पाच ते सहा इच्छुक उमेदवारांनी पक्ष श्रेष्ठींकडे अर्ज दाखल केले आहेत. यापैकी तीन जणांनी जिल्हाध्यक्ष मार्फत प्रदेश कार्यालयाकडे अर्ज पाठविले आहेत. उर्वरित दोन जणांनी थेट प्रदेश कार्यालयाकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांनी तालुका अध्यक्ष सह जिल्हाध्यक्ष यांना विश्वासात घेतले नाही.

तालुका अध्यक्ष सुर्यवंशी यांनी सांगितले की, पक्ष श्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला विजयी करण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करणार व निवडून आणणारच असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी विधानसभेला इच्छुक उमेदवार यांनी आपले व्हिजन स्पष्ट करतांना सुलोचना वाघ म्हणाल्या की,

मी शेतकरी व युवक यांच्यासाठी काम करेल, महिलांना संरक्षण देण्याबाबत लक्ष देईल तसेच महिला सक्षमीकरण करेल. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला की,तालुक्यात आपल्या महिला संघटनेत किती महिला आहेत तर त्याला उत्तर देताना सांगितले की एकूण 100 महिला आहेत. अमळनेर पोलीस ठाण्यास पुरेसे महिला पोलीस नाहीत, यासाठी आपण काय केले असा प्रश्न पत्रकारांनी केला तेव्हा मात्र वाघ यांनी सत्ताधाऱ्यांवर खापर फोडले.

तसेच दुसरे इच्छुक उमेदवार के डी पाटील म्हणाले की, पाडळसरे धरण पूर्ण करणे, बेरोजगारी कमी करण्यासाठी उद्योग धंदे सुरु करणे, सामाजिक सलोखा निर्माण करणे हा माझा उद्देश आहे. राजकारणाचा गाढा अनुभवाचा फायदा हा तालुक्याच्या विकासासाठी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संदीप घोरपडे म्हणाले की,
उपसा सिंचन योजना, पिकपेरा स्थापना करेल, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव व आदर्श गाव योजना सुरू करणे, जुनी पेन्शन योजना साठी प्रयत्न करेल. याप्रसंगी ते जमा करीत असलेले दहा रुपये तिकीट  नमिळाल्यास परत करण्याचे  पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

दरम्यान पत्रकारांनी डॉ अनिल शिंदे व किसांन सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा सुभाष पाटील यांना या पत्रकार परिषदेत का बोलविले नाही ? या प्रश्नाला उत्तर देताना मनोज पाटील यांनी सांगितले की आम्ही त्यांना बोलावले होते ते आले नाहीत. ते राष्ट्रवादीच्या बैठकीला जातात. तर काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ यांनी सांगितले की डॉ अनिल शिंदे व प्रा सुभाष पाटील हे पक्षाचा प्रोटोकॉल पाळत नाही. त्यांची तक्रार आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.

यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. डी. पाटील, काँग्रेस महिला शहर अध्यक्षा सौ नयना पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया…

आम्ही आमच्या पक्षाशी एकनिष्ठ असून आम्ही कुठल्याही दुसऱ्या बैठकांना जात नाहीत, इतर कुठं गेलो असेल तर तो पक्षाचा भाग नसेल, मी अनेक ठिकाणी पदाधिकारी असून मला त्या पदाचा मान ठेवून काही ठिकाणी जावं लागतं. त्यांनी तक्रार केली असेल तर पक्ष व आमचे नेते  योग्य निर्णय देतील. माझा पक्षावर पूर्ण विश्वास आहे. आणि सोमवारी पत्रकार परिषद होती असे मला कोणीही कळवले नाही, किंवा या बाबत मला कसलीही कल्पना नव्हती.

डॉ. अनिल शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!