महायुती तुटली तर अमळनेर भाजपचा विधानसभेसाठी उमेदवार कोण ?
चंद्रकांत पाटलांचे ते वक्तव्य खरे ठरणार की पर्यायी उमेदवार येणार…
अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुती मधील नेते एकमेकांना घरचा आहेर देत एकमेकांची उणे-तुणे काढत आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात चर्चा सुरू झालीये, ती म्हणजे युती तुटणार !
महाराष्ट्रात युती तुटली तर अमळनेरचे वातावरण काय असेल ? अमळनेरात भाजपा कोणता उमेदवार देणार ? ह्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. मग यात संदर्भ येतो मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमळनेर येथील लोकमान्य विद्यालयात केलेल्या सूचक वक्तव्याचा…
अमळनेर येथे एका कार्यक्रमानिमित्ताने मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली होती. त्यांचा लोकमान्य विद्यालयात देखील एक कार्यक्रम झाला होता, या कार्यक्रमात मंचावरील मान्यवरांचे नाव घेतांना भैरवी वाघ यांच्या बद्दल त्यांनी सूचक वक्तव्य केले होते,
भैरवी कधी अमळनेरला, कधी पुण्याला तर कधी जळगावला असतात म्हणून त्यांची आगामी निवडणुकीची तयारी सुरू आहे की काय असा सवाल करत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले होते. यावेळी अनेक उपस्थित देखील चकित झाले होते, म्हणून जर युती तुटली तर अमळनेर भाजपा कडून भैरवी वाघ उमेदवार असतील असे चिन्हे आहेत, मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य मंत्री अनिल पाटील नसतांना केले होते,
माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर गुजरातहुन आलेले प्रकाश पाटील व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चांगली जवळीक असल्याचे बोलले जाते, मात्र प्रकाश पाटील यांनी सध्या मतदार संघातील संपर्क कमी केला असल्याची चर्चा आहे. हे दोन उमेदवार व भैरवी वाघ यांना सोडून अमळनेर भाजपात पाहिजे तसा तगडा उमेदवार नाही, म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले सूचक वक्तव्य खरे ठरणार की, पर्यायी उमेदवार येणार हे आगामी काळात समजेल.