मासे पकडायला गेला अन् पुरात अडकला
अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथील घटना; पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सुखरुप काढले बाहेर
अमळनेर : तालुक्यातील बोदर्डे येथे पांझरा नदी पात्रात मासे पकडायला गेलेला एक व्यक्ती नदीतच अडकला होता तर त्याला बाहेर काढण्यासाठी गेलेला दुसरा देखील तेथेच अडकला असल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून चौफेर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जवळ – जवळ सर्वच नद्या ओसंडून वाहत आहेत. पांझरा नदीला देखील काही दिवसांपासून पूर सुरू आहे. काही वेळेस कमी जास्त पाणी होत असते, आताही पाणी कमी असल्याचे समजत अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथील एक व्यक्ती मासे पकडण्यासाठी गेला व तो तिथेच अडकला तर त्याला काढण्यासाठी दुसरा व्यक्ती गेला असता तो देखील पाणी जास्त असल्याचे तेथेच अडकला होता. यामुळे ग्राम प्रशासन, तालुका प्रशासनासह जिल्हा व मंत्रालयात असलेल्या नियंत्रण विभाग देखील कामाला लागला होता. मंत्रालयाच्या नियंत्रण विभागाने राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक (SDRF) यांच्यासह अनेकांना पत्र देऊन संबंधित व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी आदेशीत केले. शेवटी काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी संबंधित दोघांना बाहेर काढले. व सर्व यंत्रणांनी सुटकेचा निश्वास घेतला.