अमळनेरच्या तरुणावर मुसळी गावाजवळ चाकू हल्ला…
सात्रीच्या माजी सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल
अमळनेर : तालुक्यातील सुंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश पाटील यांचा मुलगा गोपाल उर्फ उमाकांत सूरेश पाटील याच्यावर शनिवारी धरणगाव तालुक्यातील मुसळी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर चाकु हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तरुण जबर जखमी झाला असून त्यावर धुळे येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अमळनेर तालुक्यातील सात्री येथील माजी सरपंच महेंद्र शाळीग्राम बोरसे यासह तिघांवर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र बोरसे व सुरेश पाटील हे दोघे माजी सरपंच असून दोघांचे रेशन दुकान आहेत. यातून त्यांची अनेक वेळेस भांडणे देखील झाली. गेल्या दोन ते अडीच वर्षांपूर्वी मोठ्या मारामाऱ्या या दोघांमध्ये झाल्या होत्या. त्याच्यात वादातून हा चाकू हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान गोपालच्या सोबत असलेला गोपालचा मामा किशोर पाटील रा. नंदगाव ता.अमळनेर ह. मु.उधना ( सुरत) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ते आणि गोपाल उर्फ उमाकांत सुरेश पाटील व शोएब असे तिघे मो. सा. क्र. एम एच १९ सी एम ७७९७ ने धरणगाव कडे जात होते. मुसळी गावाजवळ स्पीड ब्रेकर आल्याने गाडीचा वेग कमी झाला याचा फायदा घेत सात्री ता. अमळनेर चे माजी सरपंच महेंद्र शाळिग्राम बोरसे यांनी व त्यांच्या सोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती यांनी मध्ये बसलेला भाचा गोपाळ यांचेवर चाकू सारख्या हत्याराने मागील भांडणावरून वार करून त्याला जबर जखमी केले. चाकु हल्ला केल्या नंतर आरोपी पळून गेले आहेत. अशी माहिती त्यांनी पोलिसात दिली आहे. दरम्यान या बाबत पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहेत.