पांझरा – माळण नदीजोड प्रकल्पास मंजुरी द्या… डांगर वासीयांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन
या प्रकल्पाने ५०- ६० गावांचा सुटू शकतो पाणी प्रश्न

अमळनेर : तालुक्यातील पश्चिम भाग हा कायम अवर्षण प्रवण क्षेत्रात आहे. या क्षेत्रातील गावात उन्हाळ्यात कायम पिण्यासाठी शासन टँकरद्वारे पाणी पुरवठा करीत असते. या परिसरातील डांगर बु. या गावात पाण्याची कायम टंचाई असते.
प्रत्यक्षात येथूनच माळण नदीचा देखील उगम असुन ही नदी पुढे बोरी नदीला जाऊन मिळते. साधारण वीस ते बावीस गाव माळण नदी काठी वसली आहेत. डांगर बु. पासून साधारण आठ कि. मी. अंतरावर पांझरा नदी वाहत असून पांझरेचे पाणी डांगर येथील पाझर तलावात टाकल्यास माळण नदी निश्चितपणे प्रवाहीत होऊ शकते त्याचा फायदा पश्चिम भागातील साधारण ५० ते ६० गावांना होऊन पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची देखील समस्या सुटू शकते. पाडळसरे धरण जरी पूर्ण झाले तरीही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या भागाचा समावेश नसल्याने त्याचा फायदा या भागाला होणार नाही. म्हणून या क्षेत्रातील गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी पांझरा – माळण जोड प्रकल्पाचा मान्यता द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे डांगर बु. येथील ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर सरपंच प्रकाश वाघ, शेतकरी, राजेश वाघ, राकेश पाटील, जितेंद्र पाटील,महेश पाटील, राजेंद्र पाटील, सतीलाल पाटील,डॉ. एकनाथ पाटील, रोहिदास पाटील, वासुदेव पाटील, प्रवीण पाटील, किशोर वाघ, सुनील पाटील, शिवाजी पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र खैरनार, गोरख पाटील, भटू पाटील, मुकेश पाटील आदींच्या सह्या होत्या.
