नशिबाने खेळ मांडला, अन् संसार उघड्यावर आला
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मजुराचे कोसळले घर
संसार दाबला गेला महिला थोडक्यात बचावली
अमळनेर : येथील ताडेपुरा भागात राहणाऱ्या रवींद्र मांगु भोई व त्यांची पत्नी दोन्हीही मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. मुलं लहान – लहान… मजुरी करून मुलांना शाळा शिकवत त्यांच्या गरजा ते दोन्हीही पूर्ण करीत असतात, मात्र तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दोघांचा संसार नशिबाने खेळ मांडला व उघड्यावरच आला असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. घराच्या भिंती, पत्रे खाली कोसळली… सारा संसार त्यात दाबला गेला मात्र सुदैवाने महिला बचावली आहे. तर आता संसार उघड्यावर असून बाजूला असलेल्या पत्राच्या शेड मध्ये ते वास्तव्य करीत आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेरसह तालुक्यात 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पडझड झाल्याचे पाहण्यास मिळाले, अशीच घटना अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात देखील घडली आहे. ताडेपुराच्या पारधी वाडा भागात राहणाऱ्या रवींद्र मांगु भोई यांचे घर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास कोसळले असून घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. घर कोसळले तेव्हा घरात महिला होती, तिच्या डोक्याला किरकोळ मार लागला असून सुदैवाने मोठी जीवित हाणी झाली नाही. दरम्यान हा परिवार बाजूला असलेल्या एका पत्राच्या शेड मध्ये वास्तव्य करीत असून शासनाने त्यांना मदत करावी अशी मागणी परिसरातील लोकं करीत आहेत.