दिवाळीनिमित्त गरजू व विधवा महिलांना साडी भेट देऊन सन्मान

0
IMG-20261114-WA0020

कवयित्री गुंजन पाटील यांची विशेष उपस्थिती

 

अमळनेर : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह, मांगल्य आणि आपुलकीचा सण. मात्र समाजातील अनेक गरजू, निराधार व विधवा महिलांना आर्थिक परिस्थितीमुळे सणाचा आनंद मनमोकळेपणाने साजरा करता येत नाही. अशा महिलांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने जीत स्टुडिओज अँड इव्हेंट मॅनेजमेंट (JEET STUDIOS), अमळनेर यांच्या वतीने विशेष साडी भेट व महिला सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

या उपक्रमांतर्गत जीवनातील अनेक संघर्षांना सामोरे जाणाऱ्या गरजू व विधवा महिलांना साडी भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. समाजातील वंचित घटकांनाही सणाचा आनंद घेता यावा, त्यांना आपलेपणाची जाणीव व्हावी आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

 

 

या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी कवयित्री गुंजन पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या उपस्थितीत महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमाला डॉ. मनीषा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. सामाजिक जाणीव आणि महिलांप्रती असलेली संवेदनशीलता जपत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम समाजात माणुसकी, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरणार आहे.

 

 

हा साडी भेट व महिला सन्मान सोहळा मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे संपन्न होणार आहे. जीत स्टुडिओज अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे आयोजक जीत सदानंदशिव यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या उपक्रमातून गरजू महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आणि त्यांना सन्मानाने दिवाळी साजरी करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

 

दिवाळीचा खरा आनंद केवळ दिव्यांच्या रोषणाईत नसून, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे. याच भावनेतून राबविण्यात येणारा हा साडी भेट व महिला सन्मान उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, सामाजिक बांधिलकी जपणारा आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!