किशोर माळी यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात ठेवण्याचा फायदा नेमका कोणाला?
अमळनेरच्या आरोग्य विभागात चर्चांना उधाण!
माळी एवढे कार्यक्षम व्यक्ती असतील तर त्याचा फायदा इतर तालुक्याना का व्हायला नको?
अमळनेर : तालुका आरोग्य विभागातील किशोर माळी यांच्या नियुक्तीचा आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील त्यांच्या उपस्थितीचा विषय आता चर्चेचा ठरत आहे. अनेक वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत राहणे, पदोन्नतीनंतर ग्रामीण रुग्णालयात बदली होऊन लगेचच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात वर्ग होणे, तसेच तालुका आरोग्य अधिकारी जिथे तिथे किशोर माळी दिसून येत असल्याच्या चर्चांमुळे त्यांच्या नियुक्तीमागील नेमका प्रशासकीय उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एखादा कर्मचारी आपल्या कामात कर्तव्यदक्ष असेल, त्याच्या कामाचा तालुक्याला फायदा होत असेल आणि त्याच्यामुळे आरोग्य विभागाचे कामकाज अधिक गतिमान होत असेल, तर अशा कर्मचाऱ्याचे कौतुकच व्हायला हवे. मात्र, जर किशोर माळी यांच्या कार्यक्षमतेचा अमळनेर तालुक्याला खरोखरच मोठा फायदा होत असेल, तर अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा फायदा इतर तालुक्यांनाही होणे गरजेचे नाही का? अमळनेरमध्येच त्यांची सेवा कायम ठेवण्यामागे कोणती विशेष प्रशासकीय आवश्यकता आहे? इतर तालुक्यांमध्येही अशा अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मात्र, या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात किशोर माळी यांच्या उपस्थितीचा फायदा नेमका कोणाला होत आहे? त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे कामकाज सुधारले आहे का? ग्रामीण भागातील आरोग्य निरीक्षण, गावभेटी, साथरोग नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कामांना गती मिळाली आहे का? की त्यांच्या उपस्थितीचा फायदा काही ठरावीक व्यक्ती किंवा यंत्रणेतील घटकांनाच होत आहे? या प्रश्नांची उत्तरे आरोग्य विभागाने स्पष्ट करणे आवश्यक आहे.
तालुका आरोग्य अधिकारी आणि किशोर माळी यांच्यातील कथित जवळिकीबाबतही आरोग्य विभागात चर्चा होत असल्याचे बोलले जाते. जिथे तालुका आरोग्य अधिकारी, तिथे किशोर माळी अशी परिस्थिती वारंवार का दिसते? त्यांच्या उपस्थितीमागे काही विशेष प्रशासकीय जबाबदारी आहे का? वाहन चालविणे, कार्यालयीन कामकाज किंवा इतर वस्तूंचे कलेक्शन यांसारख्या कामांमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या चर्चांबाबतही अधिकृत खुलासा होणे गरजेचे आहे. या सर्व कामांसाठी त्यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत का? त्यांच्या मूळ पदाच्या जबाबदाऱ्या पूर्ण होत आहेत का? याची तपासणी होणे आवश्यक आहे.
जर किशोर माळी हे खरोखरच अमळनेर तालुक्यासाठी इतके आवश्यक आणि कार्यक्षम कर्मचारी असतील, तर त्यांच्या कामाचा अधिकृत अहवाल जनतेसमोर यायला हवा. त्यांनी तालुक्यातील किती गावांना भेटी दिल्या, किती आरोग्यविषयक समस्या सोडवल्या, किती तपासण्या केल्या आणि त्यांच्या कामामुळे किती ठोस परिणाम साध्य झाले, याची माहिती उपलब्ध व्हायला हवी. तसेच त्यांची नियुक्ती अमळनेर की चोपडा, त्यांचे अधिकृत मुख्यालय कोणते आणि त्यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात ठेवण्यामागील प्रशासकीय कारण काय, याचाही खुलासा आवश्यक आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन किशोर माळी यांच्या नियुक्तीचे आदेश, पदोन्नतीनंतर झालेल्या बदल्या, कार्यालयात वर्ग करण्यामागील कारणे, उपस्थिती नोंदी आणि प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घ्यावा. तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य निरीक्षक यांच्या कामकाजाचे स्वतंत्र मूल्यमापन करून कोणत्याही कर्मचाऱ्याला विशेष सवलत किंवा नियमबाह्य सुविधा मिळत नाहीत ना, याची खात्री करावी.
कारण प्रश्न किशोर माळी यांच्या वैयक्तिक कार्यक्षमतेचा नसून त्यांच्या नियुक्तीच्या पद्धतीचा, जबाबदाऱ्यांचा आणि प्रशासकीय निर्णयांमधील पारदर्शकतेचा आहे. एखादा कर्मचारी अमळनेर तालुक्यासाठी उपयुक्त असेल तर त्याचे स्वागतच; मात्र त्या उपयुक्ततेचे मोजमाप कामाच्या अहवालातून आणि प्रत्यक्ष परिणामांतून व्हायला हवे.
दरम्यान दिव्य लोकतंत्र न्यूजचा थेट सवाल आहे कि, किशोर माळी यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात ठेवण्याचा फायदा नेमका कोणाला होतोय? अमळनेर तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेला की काही ठरावीक व्यक्तींना? जर ते खरोखरच एवढे कर्तव्यदक्ष असतील, तर त्यांच्या सेवेचा लाभ इतर तालुक्यांनाही का मिळू नये?
अमळनेरच्या आरोग्य विभागातील या नियुक्तीचे गौडबंगाल काय, याचा खुलासा जिल्हा प्रशासन करणार का? की या प्रश्नांवरही मौनच राहणार?
दिव्य लोकतंत्र न्यूजचा पाठपुरावा सुरूच राहणार!
