किशोर माळी हे आरोग्य निरीक्षक, चालक की कलेक्टर?
अमळनेर आरोग्य विभागात ‘जिगरी यारी’ची चर्चा
जिथे तालुका आरोग्य अधिकारी, तिथे कसे किशोर माळी ?
अमळनेर : तालुका आरोग्य विभागातील प्रशासकीय कामकाज आणि काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आरोग्य विभागात एखाद्या कर्मचाऱ्याची नेमकी नियुक्ती कोणत्या कामासाठी आहे आणि त्याच्याकडून प्रत्यक्षात कोणती कामे करून घेतली जातात, याचा हिशेब जनतेला मिळणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य निरीक्षक किशोर माळी यांच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू झाली असून, ते नेमके आरोग्य निरीक्षक म्हणून काम करतात, चालकाची भूमिका बजावतात की कलेक्शन करण्याची जबाबदारीही सांभाळतात, असा उपरोधिक सवाल उपस्थित होत आहे.
किशोर माळी हे आरोग्य निरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मात्र, अनेक वेळा ते तालुका आरोग्य अधिकारी यांचे वाहन चालवताना दिसून आल्याचे बोलले जात आहे. आरोग्य निरीक्षकाच्या पदावर कार्यरत असताना वाहन चालविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे अधिकृतपणे सोपविण्यात आली आहे का? त्यासाठी स्वतंत्र आदेश आहे का? आणि या काळात त्यांच्या मूळ पदाच्या कामकाजाचे काय होते? या प्रश्नांची उत्तरे संबंधित आरोग्य प्रशासनाने देणे आवश्यक आहे.

इतकेच नव्हे, तर काही वस्तूंचे कलेक्शन करतानाही किशोर माळी दिसून आल्याचे सांगितले जात आहे. हे कलेक्शन नेमके कोणत्या वस्तूंचे असते? कोणाच्या आदेशाने केले जाते? त्यामागे शासकीय कामकाज आहे की अन्य काही कारण? या सर्व बाबींची स्पष्टता होणे गरजेचे आहे. जर हे शासकीय कामाचा भाग असेल, तर त्याचे अधिकृत आदेश आणि नोंदी काय आहेत? आणि नसेल तर आरोग्य निरीक्षकाच्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्याकडून अशी कामे कोणत्या अधिकाराने करून घेतली जातात? याचा खुलासा व्हायला हवा.
दुसरीकडे किशोर माळी यांच्या नियुक्तीचे ठिकाण नेमके अमळनेर आहे की चोपडा, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे. त्यांची अधिकृत पदस्थापना कुठे आहे? त्यांचे मुख्यालय कोणते? प्रत्यक्ष उपस्थिती कोणत्या कार्यालयात असते? तसेच तालुका आरोग्य अधिकारी जिथे जिथे जातात, तिथे तिथे किशोर माळीही दिसून येत असल्याची चर्चा आहे. मग ही केवळ प्रशासकीय कामाची गरज आहे की त्यांच्याकडे काही विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे? जर विशेष जबाबदारी असेल तर तिचा लेखी आदेश आणि कामाचा तपशील जनतेसमोर यायला हवा.
यापूर्वी त्यांच्या पदोन्नतीनंतर ग्रामीण रुग्णालयात बदली आणि त्यानंतर लगेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात वर्ग करण्यात आल्याच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. आता वाहन चालविणे, कलेक्शन, नियुक्तीचे ठिकाण आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसोबत सतत दिसून येणे अशा विविध बाबींची चर्चा होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल प्रशासकीय तपासणी होणे आवश्यक आहे.
आरोग्य निरीक्षकाचे मूळ कर्तव्य नेमके काय? त्यांच्याकडे किती गावांची जबाबदारी आहे? त्यांनी किती गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या? आरोग्यविषयक तपासणी, साथरोग नियंत्रण, स्वच्छता पाहणी आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कामांचे अहवाल किती सादर केले? त्यांच्या कामाचे मूल्यमापन कोण करतो? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय त्यांच्या कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होणार नाही.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने किशोर माळी यांच्या नियुक्तीचे आदेश, पदोन्नती व बदलीची कागदपत्रे, मुख्यालय, उपस्थिती नोंदी, त्यांच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अहवाल तपासावा. तसेच वस्तूंचे कलेक्शन करण्यामागील नेमकी जबाबदारी काय आहे, याचीही चौकशी करावी. तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य निरीक्षक यांच्या कामकाजात नियमबद्धता आणि पारदर्शकता राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती प्रशासकीय पावले उचलावीत.
दाल में कुछ काला है, या पुरी दाल काली है? हा प्रश्न आता अमळनेरच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत उपस्थित केला जात आहे. तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य निरीक्षक यांच्यातील कथित जवळीक नेमकी प्रशासकीय कामापुरती आहे की त्यापलीकडे काही हितसंबंध आहेत, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे. जिल्हा प्रशासनाने या दोघांच्या कामकाजाची स्वतंत्रपणे तपासणी करून नियमांनुसार जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात. कोणत्याही कर्मचाऱ्याला विशेष सवलत मिळत असल्याचा संशय निर्माण होणार नाही, अशी पारदर्शक व्यवस्था उभी करावी.
अखेर सवाल एकच – किशोर माळी हे आरोग्य निरीक्षक आहेत, चालक आहेत की कलेक्टर? जिथे जिथे तालुका आरोग्य अधिकारी, तिथे तिथे कसे दिसे किशोर माळी यामागे नेमके कारण काय? नियुक्ती अमळनेरची की चोपड्याची? या सर्व प्रश्नांची उत्तरे जिल्हा आरोग्य प्रशासन देणार का? अमळनेरच्या आरोग्य विभागात नेमके पाणी मुरतेय कुठे?
दिव्य लोकतंत्र न्यूजचा पाठपुरावा सुरूच राहणार… संबंधित अधिकाऱ्यांची बाजू आणि उपलब्ध कागदपत्रांसह या प्रकरणातील वस्तुस्थिती जनतेसमोर आणली जाईल.
