वाळूचे ट्रॅक्टर पकडले की फक्त ट्रॉलीच? महसूल पथकाच्या कारवाईचा अजब कारभार!
ट्रॅक्टर मालकाने महसूल पथकाच्या नाकावर टिच्चून ट्रॅक्टर पळविले?
ट्रॅक्टर मालकाला अभय कुणाचे? ट्रॅक्टर पळवूनही गुन्हा दाखल नाही!

अमळनेर : तालुक्यातील जवखेडे येथे अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्याची माहिती समोर आली असताना, संबंधित ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टर आणि ट्रॉली वेगळी करून चक्क ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळ काढला आहे. अखेर महसूल विभागाच्या हाती केवळ ट्रॉली लागली आणि ती अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. त्यामुळे वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला ट्रॅक्टरच रोखता आले नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महसूल पथकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर चालक / मालकाने ट्रॅक्टरपासून ट्रॉली वेगळी केली आणि ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. हा संपूर्ण प्रकार घडण्यासाठी साधारण पाच ते सात मिनिटांचा कालावधी लागल्याची चर्चा आहे. मात्र या पाच-सात मिनिटांत महसूल पथक नेमके काय करत होते? कारवाईसाठी पथक घटनास्थळी उपस्थित असताना ट्रॅक्टर वेगळा करून पळवून नेण्याची संधी संबंधिताला मिळालीच कशी? सरकारी कारवाई सुरू असताना वाहन पळून जाणे ही गंभीर बाब नाही का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

या प्रकरणातील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे सकाळी पकडण्यात आलेली ट्रॉली दुपारी अमळनेर तहसील कार्यालयात जमा झाली आहे. मग सकाळपासून दुपारपर्यंत नेमका एवढा वेळ का लागला? जप्त केलेली ट्रॉली तातडीने तहसील कार्यालयात आणण्यात अडचण काय होती? या विलंबामागील नेमके कारण काय, या कालावधीत नेमकी कोणासोबत आणि काय चर्चा सुरु होती याचा खुलासा महसूल विभागाने करणे गरजेचे आहे. ट्रॉली घटनास्थळावरून हलविण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आल्याची आणि ट्रॉली पलटी झाल्याचीही चर्चा आहे. मात्र या संपूर्ण घटनाक्रमाबाबत अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे, महसूल पथकाच्या कारवाईदरम्यान ट्रॅक्टर पळवून नेण्यात आला असेल, तर संबंधित व्यक्तीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे का? पळवून नेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेण्यासाठी काही कारवाई करण्यात आली का? की ट्रॅक्टर पळून गेला आणि केवळ ट्रॉली तहसील कार्यालयात जमा करून कारवाईचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
एकीकडे शासन अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचे आदेश देते, तर दुसरीकडे कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकासमोरूनच ट्रॅक्टर पळवून नेल्याची चर्चा होत असेल, तर अशा कारवाईचा धाक वाळू वाहतूकदारांना कसा बसणार? ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टर पळविला, ट्रॉली तहसील कार्यालयात जमा झाली; मात्र या संपूर्ण प्रकारात महसूल पथकाची जबाबदारी नेमकी काय होती? पथकाने योग्य ती खबरदारी घेतली होती का? कारवाईदरम्यान पुरेसे मनुष्यबळ होते का? या सर्व बाबींची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.

आता वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी जवखेडे येथील या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून घटनास्थळावरील प्रत्यक्ष घटनाक्रम, ट्रॅक्टर पळवून नेण्याची घटना, ट्रॉली तहसील कार्यालयात जमा करण्यास झालेला विलंब आणि संबंधितांवर करण्यात आलेली कायदेशीर कारवाई याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान वाळू पकडली, ट्रॉली जप्त केली; पण ट्रॅक्टर पळून गेला! मग महसूल विभागाच्या या कारवाईला यश म्हणायचे की वाळू वाहतूकदारांना मिळालेली आयती संधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

