पदोन्नतीवर ग्रामीण रुग्णालयात बदली, मग लगेचच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात वर्ग?

0
IMG-20261112-WA0041

किशोर माळी यांच्या नियुक्तीमागचे गौडबंगाल काय?

कोणाचे हितसंबंध की आर्थिक संबंध?

 

 

अमळनेर : तालुका आरोग्य विभागातील किशोर माळी यांच्या नियुक्तीचा विषय आता चर्चेचा ठरत आहे. पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची बदली ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली होती. मात्र, ग्रामीण रुग्णालयात बदली झाल्यानंतर लगेचच त्यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात वर्ग करण्यात आल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे पदोन्नती देऊन ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करण्यामागचा उद्देश काय होता आणि नियुक्तीनंतर लगेचच कार्यालयात वर्ग करण्याची एवढी घाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेत पदोन्नतीनंतर बदली आणि पदस्थापना ही ठरावीक नियम व प्रक्रियेनुसार होत असते. मग किशोर माळी यांच्या बाबतीत ग्रामीण रुग्णालयातील पदस्थापनेनंतर लगेचच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात वर्ग करण्याचा निर्णय कोणत्या प्रशासकीय कारणास्तव घेण्यात आला? हा निर्णय कोणत्या अधिकाऱ्याच्या मान्यतेने झाला? त्यासाठी कोणते कारण नमूद करण्यात आले होते? ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या सेवांची आवश्यकता नव्हती की तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात त्यांची विशेष गरज होती? या प्रश्नांची उत्तरे आरोग्य विभागाने देणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे, पदोन्नतीनंतर ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती मिळूनही प्रत्यक्ष कामकाजासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातच वर्ग होण्याची ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडली, याची कागदपत्रांसह चौकशी होणे गरजेचे आहे. संबंधित पदोन्नती आदेश, ग्रामीण रुग्णालयातील पदस्थापना आदेश, त्यानंतरचा कार्यालयात वर्ग करण्याचा आदेश आणि त्यामागील प्रशासकीय टिपणी जनतेसमोर यावी.

 

 

किशोर माळी हे आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? त्यांनी अमळनेर तालुक्यातील किती गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या? गावभेटींचे अहवाल, साथरोग नियंत्रण, स्वच्छता तपासणी आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कामांचा तपशील काय आहे? कार्यालयात बसून नेमके कोणते काम केले जाते आणि त्याचे मूल्यमापन कोण करते? याचाही खुलासा होणे गरजेचे आहे.

दुसरीकडे तालुक्यातील काही आरोग्य संस्थांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याच्या तक्रारी असताना एका कर्मचाऱ्याला वारंवार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातच वर्ग करण्यामागील कारण काय? शासनाचे बदली धोरण सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान आहे की काही कर्मचाऱ्यांसाठी वेगळे निकष आहेत? पदोन्नतीनंतर ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती आणि लगेच कार्यालयात वर्ग होण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत नेमके पाणी मुरतेय कुठे?

 

 

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित सर्व आदेश, नियुक्तीचा कालावधी, कामकाजाचा तपशील आणि गावभेटींचे रेकॉर्ड तपासावे. किशोर माळी यांचीही अधिकृत बाजू समोर आणावी. कारण प्रश्न कोणत्याही एका कर्मचाऱ्याला लक्ष्य करण्याचा नसून प्रशासकीय निर्णयांमधील पारदर्शकता आणि शासनाच्या नियमांची अंमलबजावणी यांचा आहे.

पदोन्नती ग्रामीण रुग्णालयासाठी, बदली ग्रामीण रुग्णालयात; पण लगेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात वर्ग! हा प्रशासकीय निर्णय नेमका कोणाच्या सोयीसाठी आणि कोणत्या नियमांच्या आधारे घेण्यात आला? अमळनेरच्या आरोग्य विभागाने आता याचे उत्तर द्यावेच लागेल!

 

पुढील भागात…

किशोर माळी यांच्या नियुक्ती प्रकरणानंतर आता अमळनेर तालुका आरोग्य विभागातील कथित वसुली व्यवहारांचे गौडबंगाल समोर आणणार! ही कथित वसुली नेमकी कशी होते? कोणाच्या माध्यमातून व्यवहार होतात? कोणाकडून किती रकमेची मागणी केली जाते? या संपूर्ण प्रक्रियेत कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत? याबाबत उपलब्ध माहिती, कागदपत्रे आणि संबंधितांची बाजू तपासून लवकरच सविस्तर वृत्तमालिका…

अमळनेरच्या आरोग्य विभागात नेमके पाणी मुरतेय कुठे?

वाचा, पाहा आणि प्रश्न विचारा… फक्त ‘दिव्य लोकतंत्र’वर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!