प्राथमिक आरोग्य केंद्र मांडळ रामभरोसे!

0
IMG-20261111-WA0049

१० हजार रुपये द्या, ड्युटी करा अथवा करू नका? सायंकाळी ६:३० वाजता केंद्राचे प्रवेशद्वार बंद

दिव्य लोकतंत्रच्या विशेष मोहिमेत आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड

 

 

अमळनेर : ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती पाहता ही आरोग्य व्यवस्था नेमकी जनतेच्या सेवेसाठी आहे की केवळ कागदोपत्री सुरू आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. ‘दिव्य लोकतंत्र न्यूज’च्या विशेष मोहिमेत या केंद्रातील धक्कादायक परिस्थिती समोर आली असून सायंकाळी ६:३० वाजता प्रत्यक्ष भेट दिली असता केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर चक्क प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारच बंद असल्याचे पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील एखादा रुग्ण अचानक आजारी पडला, अपघात झाला किंवा महिलेला प्रसूतीसाठी तातडीची वैद्यकीय मदत लागली, तर अशा परिस्थितीत नागरिकांनी उपचारासाठी नेमके कुठे जायचे? आरोग्य केंद्राच्या दार बंद आणि अधिकारी-कर्मचारी गायब, अशी परिस्थिती असेल तर शासनाच्या आरोग्य सेवेचा उपयोग तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होणे साहजिक आहे.

 

 

या प्रकाराबाबत प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, केवळ सूचना देऊन प्रश्न सुटणार आहेत का? प्रत्यक्षात केंद्रात कर्मचारी उपस्थित राहणार आहेत का? नागरिकांना वेळेवर उपचार मिळणार आहेत का? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. दुसरीकडे तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनला प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारीच जनतेचे फोन उचलणार नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या आरोग्यविषयक तक्रारी मांडायच्या तरी कुणाकडे? अधिकारी जनतेच्या सेवेसाठी आहेत की जनतेनेच अधिकाऱ्यांच्या मागे फिरत राहायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

दरम्यान, या आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत परिसरात आणखी एक गंभीर चर्चा रंगू लागली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १० हजार रुपये देऊन त्यांनी कर्तव्यावर हजर राहिले किंवा राहिले नाहीत तरी चालते, अशा स्वरूपाची व्यवस्था असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी ५ हजार रुपये किंवा त्यापेक्षाही कमी रकमेत कामकाज ऍडजस्ट केले जात असल्याचीही चर्चा आहे. या चर्चांमध्ये नेमके किती तथ्य आहे, पैसे कोणाकडे दिले जातात आणि अशा प्रकारची काही व्यवस्था प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, याचा आरोग्य विभागाने खुलासा करणे आवश्यक आहे. या चर्चांची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी सायंकाळी ६:३० वाजता केंद्र बंद आणि एकही कर्मचारी उपस्थित नसल्याची प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे.

 

 

एकीकडे शासन ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवते, आरोग्य सुविधांवर खर्च करते; मात्र प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीच उपलब्ध नसतील, तर या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचणार कसा? मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरी नोंदवही, ड्युटीचे वेळापत्रक, मानधन आणि कथित आर्थिक व्यवहारांच्या चर्चांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी. केवळ चौकशीचे आश्वासन न देता प्रत्यक्ष कारवाई करून नागरिकांना नियमित आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

 

 

दिव्य लोकतंत्र न्यूजचा प्रशासनाला थेट सवाल आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आहे की केवळ नावापुरते? १० हजार रुपयांच्या कथित व्यवस्थेचे सत्य काय? आणि सायंकाळी ६:३० वाजता केंद्राचे प्रवेशद्वार बंद करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कुठे जातात? आता तरी जिल्हा आरोग्य प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन ठोस कारवाई करणार का? की ग्रामीण जनतेला असेच रामभरोसे सोडणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!