मांडळमध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ!
पांझरा नदीतील वाळूची खुलेआम लूट; तलाठी-मंडळ अधिकारी मात्र सुस्त?
अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची तक्रार समोर येत असून, यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाळू माफियांकडून नदीपात्रातील वाळूची लूट सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या प्रकारावर प्रभावी कारवाई होताना दिसत नसल्याने प्रशासन नेमके कोणाच्या प्रतीक्षेत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

गावातील गौण खनिजाचे संरक्षण करणे, अवैध उत्खनन आणि वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे ही महसूल विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी हे या यंत्रणेतील महत्त्वाचे घटक असताना मांडळ येथील कथित अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
तलाठी आणि मंडळ अधिकारी फोनच उचलेनात !
मांडळचे तलाठी संदीप माळी आणि मंडळ अधिकारी एम. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलत नाहीत. एकीकडे गावात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत असताना जबाबदार अधिकाऱ्यांशी संपर्कही होत नसेल, तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यास ते फोन उचलतात. मग तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षाही अधिक कामाचा ताण आहे काय? की नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळ नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पांझरा नदीचे अस्तित्व धोक्यात?
पांझरा नदी ही परिसरासाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. नदीपात्रातील अनधिकृत वाळू उपसा सुरूच राहिल्यास पर्यावरणाचे नुकसान, नदीपात्राची रचना बदलणे आणि भविष्यात पाणीटंचाईसारख्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या कथित अवैध वाळू उपशाची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे.

‘वाळूचे रक्त मांजरीच्या तोंडाला लागले, आता सुटता सुटेना!’
या संपूर्ण प्रकारावर भाष्य करताना काही जागरूक नागरिकांनी उपरोधिक शब्दांत प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली आहे. ‘वाळूचे रक्त काही प्रमाणात का असेना मांजरीच्या तोंडाला लागले असून, ती मांजर ते रक्त सोडायला तयार नाही,’ अशा उपरोधिक चर्चेतून वाळूच्या कथित अवैध व्यवसायाबाबत नागरिकांमधील संताप व्यक्त होत आहे.

जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी
मांडळ येथील पांझरा नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून अवैध वाळू उपसा होत आहे का, याची चौकशी करावी. अवैध वाहतूक आढळल्यास संबंधित वाहनांवर कारवाई करावी. तसेच तलाठी संदीप माळी आणि मंडळ अधिकारी एम. आर. पाटील यांच्या कार्यपद्धतीचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, मांडळमधील पांझरा नदीपात्रातील कथित वाळू लुटीला प्रशासनाचा आळा बसणार तरी कधी? की वाळू माफियांचा हा खेळ असाच सुरू राहणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
