अमळनेर-धुळे रोडवरील आर. के. पेट्रोल पंपामागे आग
अग्निशमन दलाने कार्यतत्परतेने अनर्थ टळला
अमळनेर : अमळनेर-धुळे रोडवरील आर. के. पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस झाडे व कोरड्या गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात फटाके वाजवले जात असताना ही आग लागल्याने नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक आवश्यक अग्निशमन साहित्य व बंबासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून झाडे व कोरड्या गवताला लागलेली आग पूर्णपणे विझवली. त्यामुळे संभाव्य धोका टळला.


या अग्निशमन मोहिमेत कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, रफिक पठाण, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, आकाश बाविस्कर आदींनी सक्रिय सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणणे शक्य झाले.

दरम्यान, दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे आणि अग्निशमन अधिकारी गोसावी यांनी केले आहे.

फटाके वाजवताना सुरक्षित व मोकळ्या जागेची निवड करावी, कोरडे गवत, झाडे, कचरा तसेच ज्वलनशील पदार्थांच्या जवळ फटाके वाजवू नयेत. लहान मुलांनी मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके फोडावेत. तसेच फटाक्यांमुळे आग लागण्याची घटना घडल्यास तातडीने अग्निशमन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवाळीचा आनंद साजरा करताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या, असे आवाहन नगरपालिकेच्या प्रशासनाने केले आहे.
