अमळनेरात अवैध धंद्यांचा खुलेआम बाजार!

0
IMG-20261121-WA0009

चौकाचौकात सट्टा-मटका, दारू विक्रीचा सुळसुळाट

पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का?

 

अमळनेर : शहरात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून, शहरातील अनेक भागांत आणि चौकाचौकात सट्टा-मटका तसेच अवैध दारू विक्री सुरू असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. शहरातील काही ठिकाणी खुलेआम सट्ट्याचे आकडे घेतले जात असल्याची चर्चा असून, अनेक ठिकाणी दारूची विक्री सुरू असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे. याशिवाय जुगाराचे अड्डे, पत्त्यांचे क्लब आणि अवैध कुंटणखान्यांसारखे प्रकार सुरू असून अमळनेर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे, हे अवैध व्यवसाय एखाद्या आडबाजूच्या ठिकाणी लपूनछपून सुरू असल्याचे नव्हे, तर अनेक ठिकाणी चौकाचौकात सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की, शहरात नेमके काय सुरू आहे आणि संबंधित पोलिस यंत्रणेचे याकडे लक्ष का जात नाही? अवैध धंदे करणाऱ्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही का? वारंवार असे प्रकार सुरू असल्याचे आरोप होत असताना त्यांच्यावर ठोस कारवाई का होत नाही? की या व्यवसायांना कोणाचा तरी अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत आहे?

पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय किंवा स्थानिक पातळीवर कोणाचेही अभय नसताना एवढ्या बिनधास्तपणे अवैध धंदे सुरू राहू शकतात का, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. अर्थात, पोलिसांचा सहभाग किंवा संगनमत असल्याचे समोर येईलच म्हणून या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन सत्य परिस्थिती समोर आणण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस प्रशासनाची आहे.

अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, तर सट्टा-मटका आणि जुगाराच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तरुण पिढी अशा अवैध व्यवसायांच्या संपर्कात येण्याचा धोका असून, शहरातील शांतता आणि सामाजिक स्वास्थ्यालाही यामुळे बाधा पोहोचू शकते. त्यामुळे हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून अमळनेरच्या सामाजिक वातावरणाशी संबंधित गंभीर विषय आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतंत्र विशेष पथक नेमून शहरातील संशयित ठिकाणांची गोपनीय चौकशी करावी. चौकाचौकात सुरू असल्याले सट्टा-मटका आणि दारू विक्रीच्या ठिकाणांची तपासणी करावी. जुगाराचे अड्डे आणि इतर अवैध व्यवसायांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच या धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे आर्थिक हितसंबंध अथवा संगनमत आहे का, याचीही निष्पक्ष चौकशी करावी.

अमळनेर शहरात कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे. अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना मोकळे रान मिळत असल्याची नागरिकांमध्ये भावना निर्माण होत असेल, तर ती पोलिस प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. केवळ अधूनमधून छापे टाकून किंवा किरकोळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर या अवैध व्यवसायांच्या मुळापर्यंत जाऊन कारवाई करणे आवश्यक आहे.

दरम्यान अमळनेरच्या चौकाचौकात सुरू असलेले सट्टा-मटका आणि दारू विक्रीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस प्रशासन पुढाकार घेणार का? पोलिसांच्या आशीर्वादाची चौकशी होणार का? काही ठोस तथ्य आहे, हे चौकशीतून समोर येणार का? उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करून दोषींवर कारवाई होणार का? अमळनेरकरांना या प्रश्नांची उत्तरे आणि प्रत्यक्ष कारवाईची प्रतीक्षा आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!