महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ मद्यविक्रीला आळा घाला!
परवाने, अंतर आणि प्रत्यक्ष दुकानांच्या ठिकाणांची चौकशी करण्याची मागणी
अमळनेर : शहरातील महापुरुषांच्या स्मारक व पुतळ्यांच्या परिसरात सुरू असलेल्या मद्यविक्रीच्या आस्थापनांबाबत आता प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांच्या परिसरातील मद्यविक्री केंद्रे, बीअर बार व संबंधित आस्थापनांची नियमांनुसार सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करत तक्रार दाखल केली जाणार आहे.
महापुरुषांच्या पुतळ्यांपासून संबंधित मद्यविक्रीचे ठिकाण किती अंतरावर आहे, संबंधित आस्थापनांकडे वैध परवाना आहे का, परवान्याच्या अटींचे पालन होत आहे का, याची प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अधिकृत मोजणी करावी, अशीही मागणी करण्यात येणार आहे.
दोन मद्यविक्री आस्थापनांमधील अंतराचीही मोजणी करा
अमळनेर शहरातील विविध मद्यविक्री आस्थापनांमध्ये परस्परांतील अंतर नियमांनुसार आहे किंवा नाही, हा देखील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे “अमळनेर शहरातील संबंधित मद्यविक्री आस्थापनांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, परवान्यानुसार आवश्यक असलेले परस्परांतील अंतर कायदेशीर आहे किंवा नाही, विशेषतः जवळजवळ असलेल्या मद्यविक्री आस्थापनांची स्वतंत्रपणे मोजणी करून, त्यांच्या परवान्याच्या अटी व मंजूर जागेशी प्रत्यक्ष जागेची पडताळणी करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जाणार आहे.
नोंदणीचा पत्ता एक, प्रत्यक्ष दुकान दुसरीकडे?
काही आस्थापनांच्या नोंदणी अथवा परवान्यावरील पत्ता आणि प्रत्यक्ष व्यवसाय सुरू असलेले ठिकाण यामध्ये तफावत आहे का, याचीही प्रशासनाने काटेकोरपणे पडताळणी करावी, परवान्यावर दाखविलेली जागा आणि प्रत्यक्ष मद्यविक्री सुरू असलेली जागा एकच आहे का? याची तपासणी करून, आवश्यक असल्यास परवान्याची कागदपत्रे, मंजूर नकाशा आणि प्रत्यक्ष जागेची संयुक्त पाहणी करण्यात यावी.
महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरातील अंतर, दोन मद्यविक्री आस्थापनांमधील परस्पर अंतर, परवान्याचा प्रकार, मंजूर पत्ता आणि प्रत्यक्ष दुकानाचे ठिकाण या सर्व बाबींची एकत्रित तपासणी झाल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.
प्रशासनाने केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष पाहणी करावी
या संपूर्ण प्रकरणात केवळ कागदोपत्री नोंदी तपासण्याऐवजी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अधिकृत मोजणी करावी, महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान, सार्वजनिक वातावरण आणि कायद्याचे पालन या तिन्ही बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित मद्यविक्री आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करावी अथवा आवश्यक असल्यास नियमानुसार पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
