अमळनेर तालुक्यात काळाचा घाला; सकाळपासून सहा जणांचा मृत्यू
टाकरखेडा येथे कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू
खौशी येथे बाप-लेकाचा तलावात बुडून दुर्दैवी अंत
अमळनेर : अमळनेर तालुक्यात गुरुवारी सकाळपासून दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून, परिसरावर शोककळा पसरली आहे.
पहाटे टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांच्या दोन मुलांचा या घटनेत मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या घटनेचे दुःख ताजे असतानाच खौशी येथे तलावात बुडून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना समोर आली आहे. अण्णा एकनाथ तलवारे यांचा १० वर्षीय मुलगा वीरेंद्र अण्णा तलवारे हा पोहण्यासाठी तलावावर गेला होता. तो पाण्यात बुडत असल्याचे पाहील्यावर अण्णा तलवारे त्यास वाचवायला गेले असता त्यांचाही पाय घसरला व दोघेही पाण्यात बुडाले. त्यांना उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
एकाच सकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याने अमळनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांमध्येही शोकाचे वातावरण आहे.
टाकरखेडा येथील घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर खौशी येथील घटनेबाबतही संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
