आम्ही जातो आमच्या आमच्या गावा; आता रामराम घ्यावा!
स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाला साहेबराव पाटलांची पारोळ्यात हजेरी; ‘घरवापसी’च्या चर्चेला उधाण
अमळनेर : अमळनेर-पारोळा विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पुनर्रचनेच्या चर्चांना वेग आला असतानाच माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या राजकीय हालचालींनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.
आज १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनानिमित्त पारोळा येथे झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास साहेबराव पाटील यांनी भेट देत उपस्थिती लावली. विशेष म्हणजे, पाटील हे मूळचे पारोळा तालुक्यातील राजवड येथील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांच्या पारोळ्यातील वाढत्या वावराकडे आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पारोळा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच साहेबराव पाटील यांनी पारोळ्याकडे आपला मोर्चा वळविल्याचे चित्र दिसू लागले आहे. २००९ मध्ये अमळनेर-पारोळा मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या पाटलांची ही ‘पारोळा वारी’ त्यामुळे राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यातच आज स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय ध्वजारोहणासाठी पारोळ्यातील उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात मिश्किल चर्चा रंगली आहे.
“मतदारसंघाची विभागणी अजून व्हायची आहे; पण साहेबराव पाटलांची ‘घरवापसी’ मात्र ध्वजारोहणापासूनच सुरू झाली की काय?” अशी कुजबुज सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
‘आम्ही जातो आमच्या आमच्या गावा… आता रामराम घ्यावा!’ या जुन्या ओळींना राजकीय रंग देत, साहेबराव पाटील अमळनेरकडे पाठ फिरवून पारोळ्याकडे वाटचाल करण्याच्या तयारीत आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मतदारसंघाची प्रत्यक्ष विभागणी, आगामी राजकीय समीकरणे आणि साहेबराव पाटलांची भूमिका यावर पुढील काळात या ‘पारोळा वारी’चे खरे राजकीय गंतव्य स्पष्ट होणार आहे.
