शेवटी अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा निलंबित
दिव्य लोकतंत्रच्या पाठपुराव्याला यश
अमळनेर : तालुक्यातील अवैध वाळू बाबत तहसीलदार यांचे दुर्लक्ष तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाळू वाहतुकीच्या प्रश्नावर दिव्य लोकतंत्रने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या गंभीर प्रश्नावर वेळोवेळी वृत्तांकन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर महसूल व वन विभागाने अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर १२ ऑगस्ट २०२६ रोजी निलंबनाची कारवाई केली आहे.
अमळनेर तालुक्यातील तापी आणि बोरी नदीपात्रातून होणारे अवैध वाळू उत्खनन व वाहतूक तसेच गौणखनिजाच्या अनधिकृत उत्खननाबाबत दिव्य लोकतंत्रने सातत्याने आवाज उठविला होता. संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई करावी आणि अवैध गौणखनिजाला आळा घालावा, यासाठी प्रशासनाच्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधण्यात आले होते.
महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, अमळनेर तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंध करण्याची वैधानिक प्रशासकीय जबाबदारी तहसीलदार म्हणून असतानाही सुराणा यांची भूमिका निष्क्रिय व बेजबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दिव्य लोकतंत्रने तापी आणि बोरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाचा मुद्दा सातत्याने लावून धरत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. या वृत्तांकनामुळे हा विषय प्रशासनाच्या आणि शासनाच्या पातळीवर चर्चेत आला. अखेर तहसीलदार सुराणा यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने दिव्य लोकतंत्रच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
अवैध वाळू उत्खनन आणि गौणखनिज वाहतुकीविरोधात भविष्यातही प्रशासनाकडून कठोर व प्रभावी कारवाई होणे अपेक्षित असून, तापी आणि बोरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाला कायमस्वरूपी आळा बसणार का, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.
