स्वातंत्र्यदिनाच्या पत्रिकेतच घोळ

0
IMG-20260814-WA0020

अमळनेर तहसील प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

 

अमळनेर : देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतच मोठी चूक झाल्याने अमळनेर तहसील प्रशासनाचा भोंगळ कारभार चर्चेत आला आहे. १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर ‘भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिन’ असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही पत्रिका तहसील कार्यालयाच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावेही आहेत.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचा क्रमांक ८० वा येतो. स्वातंत्र्यप्राप्तीला ७९ वर्षे पूर्ण होत असली तरी १९४७ चा पहिला स्वातंत्र्यदिन धरता २०२६ हा ८० वा स्वातंत्र्यदिन आहे. त्यामुळे अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर ७९ वा वर्धापन दिन असा उल्लेख होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतील मजकूर छपाईपूर्वी तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? पत्रिका तयार झाली, प्रूफ तयार झाला आणि छपाईही झाली; मात्र एवढी साधी बाब प्रशासनाच्या लक्षात आली नाही का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अधिकृत पत्रिकेतच स्वातंत्र्यदिनाचा क्रमांक चुकीचा छापला जात असेल, तर तहसील प्रशासनाच्या कामकाजातील तपासणी यंत्रणा नेमकी करतेय तरी काय? असा संतप्त सवालही केला जात आहे.

तहसील कार्यालयाच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर अशी चूक होणे ही केवळ अंकाची चूक नसून शासकीय कामकाजातील निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पत्रिका नागरिक, अधिकारी आणि मान्यवरांपर्यंत पोहोचण्यापूर्वी तिची अंतिम तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाचीच असते. मग ही चूक कोणाच्या निदर्शनास आली नाही, याचे उत्तर तहसील प्रशासनाने देणे आवश्यक आहे.

तर तत्कालीन तहसीलदार महोदय यांना स्वातंत्र्यदिनाच्या निमंत्रण पत्रिकेवरच ७९ वा की ८० वा हे ठरवता येत नसेल, तर प्रशासनाच्या इतर कामकाजाची तपासणी कोण करणार? असा थेट सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. अधिकृत पत्रिकेतील या चुकीबाबत तहसील प्रशासनाने खुलासा करावा आणि चुकीची पत्रिका दुरुस्त करून योग्य माहिती प्रसारित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय व महत्त्वाच्या कार्यक्रमातही प्रूफरीडिंगचा अभाव दिसत असेल, तर जबाबदारी निश्चित होणार तरी कधी? हा प्रूफरीडिंगचा चा अभाव आहे कि प्रशासनाचा भोंगळ कारभार असा सवाल आता अमळनेरकर विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!