अमळनेरच्या महसूल यंत्रणेत ‘प्रसादा’चा खेळ? नायब तहसीलदारांबाबतचे कथित रेकॉर्डिंग ‘दिव्य लोकतंत्र’च्या हाती
तलाठ्याच्या कथित संभाषणात ‘वरिष्ठांपर्यंत प्रसाद पोहोचतो’ चा दावा
अमळनेर : तालुक्यातील महसूल यंत्रणेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे एक कथित ध्वनिमुद्रण ‘दिव्य लोकतंत्र’च्या हाती लागले आहे. या ध्वनिमुद्रणात एका तलाठ्याचा आवाज असल्याचा दावा केला जात असून, नायब तहसीलदारांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ‘प्रसाद’ पोहोचत असल्याचे कथितरीत्या बोलले जात असल्याचे समोर येत आहे.
विशेष म्हणजे या संभाषणात पांझरा नदीकाठावरील वाळू उपशाशी संबंधित व्यवहारांचा संदर्भ असल्याचे बोलले जात आहे. वाळू माफिया पासून एक प्रतिष्ठित नागरिक तेथून नायब तहसीलदार आणि मग प्रसाद वरिष्ठ अधिकारी अशी कथित साखळी या संभाषणातून समोर आली आहे.
या ध्वनिमुद्रणाची सत्यता आणि त्यातील संभाषणातील व्यक्तींची ओळख अद्याप अधिकृतरीत्या निश्चित झालेली नाही. त्यामुळे रेकॉर्डिंगची तांत्रिक तपासणी करून त्यातील दाव्यांची सत्यता तपासणे अत्यावश्यक आहे.
‘प्रसाद’ नेमका कोणासाठी? नायब तहसीलदारांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा प्रसाद पोहोचवला जातो का? या प्रश्नांची उत्तरे चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकतात.
पांझरा काठावरील वाळू व्यवहारांवरही संशयाची छाया
पांझरा नदीकाठावरील वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर हे कथित रेकॉर्डिंग समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. रेकॉर्डिंगमधील दावे खरे असल्यास महसूल प्रशासनातील काही घटक आणि वाळू उपशाशी संबंधित व्यक्तींमधील कथित संबंधांची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण होते.
दिव्य लोकतंत्रची मागणी : सत्य बाहेर यावे!
‘दिव्य लोकतंत्र’च्या हाती लागलेल्या या कथित ध्वनिमुद्रणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. कथित आर्थिक व्यवहार आणि पांझरा काठावरील वाळू उपशाशी त्याचा संबंध याची चौकशी व्हावी.
चौकशीत आरोप सत्य आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि इतर व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच रेकॉर्डिंग बनावट अथवा दिशाभूल करणारे असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यामागील व्यक्तींचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
