कत्तलखान्यात गोहत्या करणाऱ्या मुख्य दोघांची नावे तक्रारीतून गायब? विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपी मोकाट!

0
IMG-20261123-WA0014

अमळनेर पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह

गोहत्या प्रकरणापासून हत्या पर्यंत तर रेशन घोटाळा आणि ॲट्रॉसिटी प्रकरणांपर्यंत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नांची सरबत्ती!

 

 

अमळनेर : पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शहरातील कथित गोहत्या प्रकरणात मुख्य संशयितांची नावे तक्रारीतून वगळण्यात आल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे हत्या, रेशन घोटाळा आणि ॲट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्ह्यांतील काही आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारांवर नेमका किती वचक आहे आणि गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्याबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका काय आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी अमळनेर शहरातील एका कत्तलखान्यावर गोहत्या होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी धाड टाकल्याची घटना समोर आली होती. या कारवाईत काही जणांना ताब्यात घेण्यात आले, तर काही संशयित आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणात प्रत्यक्ष गोहत्या करणारे जाबीर आणि जहिर या दोघांची नावे फिर्यादीत का नाहीत. या दोघांची भूमिका असल्याबाबत चौकशी झाली का, त्यांची नावे तक्रारीत का आली नाहीत? त्यांची चौकशी झाली आहे का? त्यांना अभय दिले जात आहे का? की तपासात काही वेगळे तथ्य समोर आले आहे? असे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित होत आहेत. या सर्व बाबींची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे गरजेचे आहे.

गोहत्येच्या विषयासह अमळनेर तालुक्यातील नगाव येथील शरद पाटील हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच नगाव येथील रेशन घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या दोन ते तीन गुन्ह्यांतील आरोपी अद्याप मोकाट असल्याचे आरोप केले जात आहेत. हे सर्व गुन्हे गेल्या काही महिन्यांतील असल्याचे सांगितले जात असून, यापूर्वीच्या काही गुन्ह्यांतील आरोपीही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याचा समजते.

एकीकडे गंभीर गुन्हे घडत आहेत, गुन्हे दाखल होत आहेत; मात्र दुसरीकडे संबंधित आरोपींना अटक होण्यास विलंब का होत आहे? फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी कोणती पथके कार्यरत आहेत? त्यांच्यावर प्रत्यक्षात काय कारवाई करण्यात आली? तपासात प्रगती नसेल तर त्याची कारणे काय? अशा प्रश्नांची उत्तरे पोलीस प्रशासनाने देणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल करणे एवढीच पोलिसांची जबाबदारी नसून, गुन्ह्याचा निष्पक्ष तपास करून दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणणे हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.

विशेष म्हणजे, शहरातील अवैध धंदे, सट्टा-मटका आणि अवैध दारू विक्रीबाबतही यापूर्वी अनेकदा तक्रारी आणि आरोप समोर आले आहेत. चौकाचौकात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी होत असतील आणि गंभीर गुन्ह्यांतील आरोपीही अटकेपासून दूर राहत असतील, तर सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे स्वाभाविक आहे. पोलिसांचा कायद्याचा धाक गुन्हेगारांमध्ये निर्माण होणार नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची?

या संपूर्ण प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष घालणे आवश्यक आहे. गोहत्या प्रकरणातील फिर्याद, तपासाची दिशा आणि संबंधित संशयितांची भूमिका यांची वरिष्ठ स्तरावर पडताळणी व्हावी. तसेच हत्या, रेशन घोटाळा आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांतील आरोपी अद्याप अटकेत का नाहीत, याचा आढावा घेऊन त्यांच्या शोधासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. संबंधित प्रकरणांत कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का, याचीही चौकशी व्हावी.

अमळनेर पोलिसांना फक्त एकच काम प्राधान्याचे वाटते? अवैध धंद्यांवर नियंत्रण, गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि फरार आरोपींना अटक करणे ही पोलिसांची मूलभूत कर्तव्ये नाहीत काय? गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असताना वारंवार असे प्रश्न उपस्थित होत असतील, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

आता जिल्हा पोलीस अधीक्षक या सर्व प्रकरणांची दखल घेऊन अमळनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेणार का? गोहत्या प्रकरणातील तक्रारीतून नावे वगळल्याच्या आरोपामागचे सत्य काय? गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अद्याप अटकेबाहेर का आहेत? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळणार की पुन्हा एकदा केवळ आश्वासनांवरच बोळवण होणार? अमळनेरकरांना आता केवळ खुलाशांची नव्हे, तर ठोस कारवाईची अपेक्षा आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!