दुखत कुठं आणि उपचार कुठं?
तापीतील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष, बोरी नदीवर मात्र रात्रीचे पथक
अमळनेर : तालुक्यातील वाळू उत्खननाच्या प्रश्नावर महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकीकडे तापी नदीपात्रात वाळू ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करण्यात आल्याने निर्माण झालेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याची चर्चा असताना, दुसरीकडे बोरी नदी परिसरात रात्रीचे पथक तैनात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तापी नदीवरील वाळू ठेक्यांवर उत्खननासाठी बोटी व इतर यंत्रसामग्रीचा वापर झाल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकारी, जळगाव यांनी यापूर्वी कारवाई केली होती. त्यानंतर संबंधित ठेके बंद करण्यात आले. मात्र, उत्खननामुळे नदीपात्रात तयार झालेले मोठमोठे खड्डे आता बुजवले जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे उत्खननाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या मते, अशा गंभीर बाबीकडे महसूल विभागाने अधिक लक्ष देणे अपेक्षित असताना बोरी नदी परिसरात रात्रीच्या गस्तीसाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी सध्या कोणतीही मोठी हालचाल नसल्याचे सांगितले जात आहे, त्या ठिकाणी प्रशासनाचे लक्ष केंद्रित होत असल्याने “दुखत कुठं आणि उपचार कुठं?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तापी नदीपात्रातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे बुजवण्यामागील वस्तुस्थिती तपासावी, तसेच वाळू उत्खननाशी संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर तहसील प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडल्यास निर्माण झालेल्या शंकांचे निरसन होण्यास मदत होणार आहे.
