पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागाला श्री मंगळग्रह मंदिरात सुरूवात

0
IMG-20260604-WA0019

अधिकमासानिमित्त आयोजन; मुख्य यजमान डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह अग्रवाल, दीक्षित, कुलकर्णींकडून सपत्नीक पूजा-अर्चा

 

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात अधिकमासानिमित्त बुधवार, दि. 3 जून रोजी सकाळी 9 वाजता संकष्टी चतुर्थीच्या पवित्र पर्वात मंत्रोपचाराचा जागर करीत भक्तिमय आणि चैतन्यमयी उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली. आशियास्टार आयकॉन अवॉर्ड प्राप्त, अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच समाजकार्य फाऊंडेशनचे मुख्य यजमान डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह खानेदश शिक्षण मंडळ या संस्थेचे चेअरमन विनोद अग्रवाल, मनोहर दीक्षित आणि मंदार कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते सपत्नीक प्रायश्चित्त संकल्प, शांतीपाठ, प्रधान संकल्प, गणपती वरुण पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वर्णन, दीग्‌‍रक्षण आदी पंचांग कर्म करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मी-नारायण भद्र मंडल स्थापना करण्यात येऊन नारायणपीठ देवता पूजन, नारायण यंत्र स्थापन करून नारायण, वराह व शालिग्राम देवतांचे राजोपचार पूजन करण्यात आले. तसेच पुरुषसुक्ताच्या षोडश आवर्तन अभिषेक करण्यात आला. यावेळी सहस्त्र तुलसीपत्र अर्चन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता यजमानांच्या हस्ते नवग्रह, रुद्रकलश स्थापन करून अग्नीमंथन करून अग्निकुंड प्रज्वलित करण्यात आले. अग्नी व कुंडदेवता स्थापन करण्यात आले. नवग्रह देवतांचे हवन, नारायणसहस्त्र नाम हवन, पायस विशेष आहुती देण्यात आली.
दुपारी 4 वाजता अधिकमास महात्म्य कथेचे निवेदक नाशिक निवासी व्यास आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी यांनी आपल्या अमोघ वाणीच्या माध्यमातून कथेचा प्रारंभ केला. सायंकाळी 6 ते 6.30 दरम्यान श्री मंगळग्रह देवतेची महाआरती होऊन आजच्या प्रथम दिवसाची सांगता झाली.
मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांसह मंगल सेवेकरी आशिष चौधरी, भाविक व मंदिरातील सेवेकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव यांनी मुख्य पौरोहित्य केले. त्यांना पुरोहित प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, यश जोशी, गणेश जोशी, वैभव लोकांक्षी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, हेमंत गोसावी, उमेश पाठक यांनी सहकार्य केले. कथा निरूपणावेळी चंद्रकांत जोशी आणि कॅसिओ वादक गणेश जोशी यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!