चिमणपुरी शिवारात वडाचे झाड कोसळले; गाय व मोटरसायकलचे नुकसान

0
IMG-20260604-WA0017

 मनुष्यहानी टळली

अमळनेर : तालुक्यातील चिमणपुरी शिवारात बुधवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास अचानक एक भलेमोठे वडाचे झाड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत एका गायीसमवेत जवळ उभी असलेली मोटरसायकल झाडाखाली दबली गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चिमणपुरी येथील पुरुषोत्तम चौधरी यांच्या शेतात घडली. दुपारचे जेवण उरकून शेतमजूर व शेतकरी कापूस लागवडीच्या कामाला सुरुवात करत असतानाच अचानक झाड कोसळले. काही क्षणांपूर्वीच मजूर व शेतकरी झाडाच्या परिसरातून दूर गेल्याने मोठा अनर्थ टळला. अचानक झालेल्या जोरदार आवाजाने परिसरातील नागरिक व शेतकरी घटनास्थळी धावले.
झाडाखाली अडकलेल्या गायीला स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत करून बाहेर काढले. सुदैवाने गायीचा जीव वाचला असला तरी ती किरकोळ जखमी झाली आहे. मात्र, मोटरसायकल पूर्णपणे झाडाखाली दाबली गेल्याने तिचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे काही काळ शेतातील कामे ठप्प झाली होती. शिवारातील शेतकरी व मजूर मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या व विशाल झाडांची नियमित पाहणी करण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच धोकादायक फांद्या छाटणे व कमजोर झालेली झाडे हटवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, “क्षणात घडलेली घटना आणि थोडक्यात बचावलेले जीव” यामुळे चिमणपुरी परिसरात दिवसभर या घटनेची चर्चा रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!