गलवाडे रस्त्यावरील केले नगर वळणावर खड्डे देताय अपघातास आमंत्रण
तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी

अमळनेर : ते गलवाडे मार्गावरील केले नगरच्या वळणावर दोन्ही बाजूंना खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा मार्ग धोकादायक बनला असून अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यावसायिक प्रवास करतात. मात्र या ठिकाणील रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवासही जीवघेणा ठरत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात अनेक वेळा लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत व नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
