व्यावसायिक सिलेंडर टंचाईचा फटका; हॉटेल व्यावसायिकांचा पर्यायी मार्गाकडे कल
तुम्ही खाताय तो नाश्ता/जेवण कशावर तयार झालंय नक्की वाचा…

अमळनेर : शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होत असून अनेक व्यावसायिकांनी पर्यायी उपायांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने काहींनी लाकडी भट्टी, पारंपरिक चुली, डिझेल भट्ट्या तसेच विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या साहाय्याने हॉटेल सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील काही दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याची तक्रार हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. नियमितपणे मिळणारे सिलेंडर वेळेवर न मिळाल्याने स्वयंपाक व्यवस्था विस्कळीत झाली असून व्यवसायावर आर्थिक परिणाम होत आहे. ग्राहकांची मागणी कायम असताना गॅसअभावी सेवा देणे कठीण जात असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर काही हॉटेल चालकांनी लाकूड वापरून भट्टी पेटवण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी डिझेलवर चालणाऱ्या भट्ट्यांचा वापर केला आहे. काही आधुनिक हॉटेल्सनी विजेवर चालणारे स्टोव्ह, इंडक्शन व इतर उपकरणांचा वापर करून पर्याय शोधला आहे. मात्र या सर्व पर्यायांमुळे खर्चात वाढ होत असून नफा कमी होत असल्याचीही खंत व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून सिलेंडर टंचाई नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात उपलब्धता कमी असल्याचा दावा व्यावसायिक करत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर तातडीने तोडगा काढून नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.
सिलेंडर पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात हॉटेल व्यवसायावर अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
