अमळनेरात रेल्वे लाईनलगत भीषण आग
अग्निशमन दलाची धावपळ, २-३ तासांच्या प्रयत्नांनी आग नियंत्रण

अमळनेर : शहरात रेल्वे लाईनलगत दोन ठिकाणी लागलेल्या आगीमुळे आज मोठी खळबळ उडाली. दोन्ही बाजूंनी आग भडकत असल्याने व घटनास्थळी पोहोचण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

प्राथमिक माहितीनुसार, ख्वाजा नगर परिसरातील रेल्वे लाईनलगत प्रथम आग लागल्याची घटना घडली. परिसरात कोरडी झाडेझुडपे व कचरा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न करत असतानाच जपान जीन भागातही दुसरीकडे आग लागल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अग्निशमन दलाची मोठी तारांबळ उडाली.
नगर परिषद मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या सूचनेनुसार अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांनी तत्काळ दोन्ही ठिकाणी समन्वय साधत पथके पाठवली. अरुंद मार्ग, उष्ण वारे आणि दोन्ही बाजूंनी पसरत असलेली आग यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले होते.
अग्निशमन दलाने जवळपास दोन ते तीन तास अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात गवत व झाडझुडपांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, रेल्वे लाईनलगत साचलेला कचरा व कोरडी वनस्पती यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
