“बांधकाम सुरू असतानाच शाळा सुरू; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?”
“सुरक्षेचा बळी शिक्षण? अपूर्ण इमारतीत सुरू शाळा”

अमळनेर : शहरातील गलवाडे रस्त्यावरील एका नामांकित पोदार शाळेत इमारतीचे बांधकाम अद्याप अपूर्ण असतानाच शाळा सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या शाळेच्या परिसरात सेंट्रिंगचे काम, लोखंडी साहित्याची हालचाल आणि इतर बांधकामे सुरू असून, त्याच ठिकाणी लहान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बसवले जात असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, शाळेच्या परिसरात उघडे लोखंडी रॉड, सेंट्रिंग प्लेट्स आणि बांधकामाचे साहित्य विखुरलेले दिसून येत आहे. अशा परिस्थितीत एखादी लोखंडी प्लेट, हातोडा किंवा इतर साहित्य विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच जमिनीवर पडलेल्या खिळ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या पायांना दुखापत होण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे.
पालकांच्या मते, “लहान मुलांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून शाळा सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे सुरक्षा उपाय दिसून येत नाहीत. काही अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, संबंधित शाळेला नगरपरिषदेकडून आवश्यक बांधकाम पूर्णता प्रमाणपत्र (Completion Certificate) आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे का, तसेच अग्निसुरक्षा विभागाचे (Fire Safety) प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित शाळेकडे ही कागदपत्रे आहेत का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेता, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
