“मापात पाप करणाऱ्या कंपनीसमोर बाजार समिती नरमली? सील केलेली आर. के. फूड्स पुन्हा सुरू”
शेतकऱ्यांची लूट उघडकीस आल्यानंतर कारवाई; धमकीच्या पत्रानंतर निर्णय बदलला — तडजोडीच्या चर्चांना उधाण

अमळनेर : शेतकऱ्यांच्या गव्हाचे वजन करताना मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने सील करण्यात आलेली तालुक्यातील मंगरूळ येथील आर. के. फूड्स कंपनी पुन्हा सुरू करण्यात आल्याने बाजार समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीच्या धमकीभऱ्या पत्रानंतर बाजार समितीने माघार घेतली का, असा सवाल शेतकरी आणि नागरिकांमध्ये उपस्थित होत असतानाच या प्रकरणात आर्थिक तडजोड झाल्याचीही चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
सोनखेडी येथील दीपक देविदास पाटील यांनी आपला गहू विक्रीसाठी मंगरूळ एमआयडीसीमधील आर. के. फूड्स कंपनीत आणला असता ५० ते ५५ क्विंटल माल असताना वजन केल्यानंतर केवळ ४१ क्विंटल दाखवण्यात आला. त्याचप्रमाणे गंगापुरी येथील रवींद्र विठ्ठल पाटील यांच्या गव्हाच्या वजनातही मोठी तफावत आढळली. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच संतप्त शेतकऱ्यांनी धुळे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले.
या घटनेनंतर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक शरद पाटील, वृषभ पारख, प्रकाश वाणी, सचिव डॉ. उन्मेष राठोड, तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत केल्यानंतर सर्वांसमक्ष कंपनीच्या काट्यावर पुन्हा वजन करण्यात आले असता मोठी तफावत समोर आली. २०० क्विंटल मालाचे वजन केवळ ९० क्विंटल आणि १०० क्विंटल मालाचे फक्त ४० क्विंटल भरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर बाजार समितीने तत्काळ कारवाई करत आर. के. फूड्स कंपनीला सील लावले होते. विशेष म्हणजे संबंधित वजन काटा १३ जानेवारी रोजी वजन-माप निरीक्षकांकडून पास करण्यात आला होता, ही बाबही चर्चेचा विषय ठरली.
दरम्यान कंपनीकडून बाजार समितीला “कंपनी सील करण्याचा अधिकार नाही” असा दावा करत धमकीच्या स्वरूपाचे पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर बुधवारी रात्री बाजार समितीने कंपनी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांची लूट उघडकीस आल्यानंतरही कंपनीवर कठोर कारवाई न होता उलट ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय का घेतला गेला? कंपनीच्या दबावाला बाजार समिती बळी पडली का? की या प्रकरणात काही आर्थिक तडजोड झाली आहे का, अशी चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे.
दरम्यान वांधा समितीच्या बैठकीत काय निर्णय झाला हे अद्याप गुलदस्त्यात असून मात्र शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न कायम आहे — मापात पाप करणाऱ्यांवर कारवाई होणार की पडद्यामागील तडजोडीतून प्रकरण दडपले जाणार?
