अमळनेरात बिल्डरची दादागिरी ?
घरावर जेसीबी फिरवल्याचा आरोप

अमळनेर : शहरात बिल्डरच्या कथित दादागिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यू प्लॉट परिसरातील टी.पी. नं. 45/01 येथील दोन खोल्यांचे भाड्याचे घर जेसीबीने पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ते आपल्या कुटुंबासह संबंधित घरात सुमारे 75 ते 80 वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत होते. वीज मीटर व पाणी जोडणी त्यांच्या नावावर असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी फिर्यादी शेतात असताना त्यांना फोनद्वारे घर पाडले जात असल्याची माहिती मिळाली. घरी धाव घेतली असता जेसीबीद्वारे घर जमीनदोस्त केल्याचे दिसून आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात बिल्डर सरजू गोकलानी व इतर काही जणांविरोधात जबरदस्तीने घर पाडणे, शिवीगाळ करणे व जीव मारण्याची धमकी देणे असे आरोप करण्यात आले आहेत. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, घरातील लोखंडी कपाट, रॅक, स्टील शेल्फ, गॅस शेगडी, कूलर, पंखे यांसह सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा प्रक्रिया न करता ही कारवाई करण्यात आली. “ही सरळसरळ बिल्डरची दादागिरी आहे,” असा संतप्त आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
