प्रभाग 12 मध्ये राष्ट्रवादीकडून ‘रेशन माफिया’ला उमेदवारी?
मतदारांमध्ये तीव्र नाराजी ; विजय न होता पराजय निश्चित

अमळनेर : नगर परिषद निवडणुकीत आज चौथा दिवस असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 12 मध्ये एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. अवैध धंद्यांद्वारे पैसा कमावणारा आणि रेशनमधून गोरगरिबांची लूट करणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग 12 मध्ये राष्ट्रवादीत इतर कोणतेही ठोस इच्छुक नसल्याने, या रेशन माफियाच्या पत्नीच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. मात्र, या हालचालीमुळे स्थानिक मतदारांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
प्रभागातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीने रेशनच्या माध्यमातून गरिबांची लूट केली असून, आता त्याच पैशाच्या जोरावर मतदारांना विकत घेण्याचा डाव आखला जात आहे. “गरिबांना फसवून राजकारणात उडी मारायची ही प्रवृत्ती थांबली पाहिजे,” अशी मतदारांची एकमुखी मागणी आहे.
तिकीट महिलेलाच मिळणार असले तरी स्थानिक पातळीवर पुरुषप्रधान राजकारण असल्याने प्रत्यक्षात पतीच सर्व निर्णय घेणार हे गुपित नाही. त्यामुळे उमेदवार महिला असली तरी निवडणुकीचा संपूर्ण कारभार रेशन माफियाच सांभाळणार, अशी चर्चा नागरिकांत आहे.
प्रभागातील काही जुन्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “राष्ट्रवादीने जर या रेशन माफियाला तिकीट दिलं, तर कार्यकर्त्यांमध्ये बंडाळी उसळेल आणि पक्षाचा विजय न होता पराजय निश्चित आहे.”
प्रभाग 12 मध्ये मतदार आता जागरूक झाले असून, “स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारालाच संधी द्यावी” अशी मागणी होत आहे. काही समाजसेवी संघटनांनी देखील या प्रकरणाची दखल घेऊन पक्षनेतृत्वाकडे तक्रार पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.
