अवैध धंद्यासाठी पोलिसांशी हुज्जत – भावी नगरसेवकाच्या वागणुकीची शहरात चर्चा!

0

निलंबित पोलिसांवरही लाचखोरीचे आरोप; अमळनेरात राजकीय रंग चढला

 

 

 

अमळनेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापलेले असताना, एका भावी नगरसेवकाने पोलिस ठाण्यात येऊन आपल्या अवैध धंद्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातल्याचा प्रकार उघड झाल्याने शहरभर चर्चेचा विषय बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झामी चौक परिसरात एका व्यक्तीकडून अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्री गस्त घालत असताना पोलिसांनी कारवाई करून त्या व्यक्तीस ताब्यात घेतले व पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले.

मात्र, या घटनेनंतर थोड्याच वेळात संबंधित व्यक्तीच्या पाठिशी उभा राहण्यासाठी एका भावी नगरसेवकाने पोलिस ठाण्यात प्रवेश करत पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे सांगितले जाते. “कुठं आहे तुमचा साहेब? बोलवा त्याला… आम्ही हप्ते देतो, तरीही आमच्यावर कारवाई करता?” — असे म्हणत त्याने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समोर आली आहे.

या दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सध्या निलंबित असलेल्या दोन पोलिस कर्मचारी आमच्याकडून दर महिन्याला हप्ते घेतात, असा गंभीर आरोपही संबंधित भावी नगरसेवकाने केला असल्याचे सांगितले जाते. यामुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे.

राजकीय क्षेत्रात अद्याप निवडणूक प्रक्रियेत असताना एवढा दबाव व तोरा दाखवणाऱ्या या इच्छुक उमेदवारावर लोकांमध्ये टीकेची झोड उठली आहे. “अजून निवडून आला नसतानाही अशी वर्तणूक, तर निवडून आल्यावर काय होईल?” असा सवाल शहरवासीय विचारत आहेत.

या घटनेबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. दरम्यान, हा प्रकार राजकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण करू शकतो, अशी चर्चा अमळनेरात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!