अमळनेरला तुतारी मिळण्यासाठी अजून 2 दिवस लागण्याची शक्यता…
कृषिभूषण साहेबराव पाटील व डॉ. अनिल शिंदे यांचा तिढा अजून सुटेना
अमळनेर : विधानसभा मतदार संघाला तुतारी मिळण्यासाठी अजून दोन दिवस वाट पहावी लागणार असल्याची शक्यता आहे. कारण मुंबईत सुरू असलेला कृषिभूषण साहेबराव पाटील व डॉ. अनिल शिंदे यांच्यात सुरू असलेला तिढा अजून सुटत नाहीये.
काल डॉ. अनिल शिंदे यांना तिकीट जाहीर झाल्याची बातमी मतदार संघात पसरली होती. मात्र ही फक्त अफवा असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. तर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तिकीट वाटप होणार होते. मात्र आतापावेतो ते झालेले नाही. अमळनेर मतदार संघाला तुतारी मिळवण्यासाठी अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आमच्या खात्रीशीर सूत्रांनी व्यक्त केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करणे आज पासून सुरू झाले आहे. मात्र आता पर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी जाहीर झाली नसल्याचे पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत.