गणिताचा मुलभूत अभ्यास ही काळाची गरज… प्रा. दिपक पथवे यांचे प्रतिपादन
अमळनेर : भारतात प्राचीन काळापासून गणिताचा मूलभूत अभ्यास होत होता यासाठी आर्यभट्ट, भास्कराचार्य,ब्रह्मगुप्त, माधव यांची उदाहरणे देता येतील. यांच्या अभ्यासाने जगात गणिताचा अभ्यास कसा करावा याची दिशा ठरवून दिली, असे प्रतिपादन मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील प्रा.दिपक पथवे यांनी केले. खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विभागाने आयोजित केलेल्या भारतीय गणिताची परंपरा : काळाचा प्रवास या व्याख्यानात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आधुनिक काळात प्राचीन काळाच्या तुलनेत गणिताचा अभ्यास कमी झाला आहे. गणिताच्या अभ्यासाने वर्तमानाशी समरूप होणे सोपे जाते. मानवी जीवनाच्या सफलतेच्या अनेक शक्यता गणिताच्या अभ्यासाने सोडविता येऊ शकतात, असा मौलिक सल्ला यावेळी विद्यार्थ्यांना दिला तसेच यांनी भारतीय गणिताच्या इतिहासावर आधारीत प्रवासाची सखोल मांडणी केली. त्यांनी शुल्बसूत्र, बौधायन, जैन गणित यांचे विस्तृतपणे योगदान विषद केले. त्यानंतर आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, माधव यांसारख्या महान गणित तज्ञांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
रामानुजन यांच्या आधुनिक गणितातील योगदानाचे विशेष उल्लेख करताना, त्यांनी त्यांचे मूळ हस्तलिखित दाखविले आणि त्यांच्या कार्याचा आधुनिक गणितावर कसा प्रभाव आहे याबद्दल सुक्ष्मत्वाने चर्चा केली. आपल्या प्रास्ताविकात गणित विभागप्रमुख डॉ. नलिनी पाटील यांनी या व्याख्यानाची गरज स्पष्ट केली तसेच हे व्याख्यान भारतीय ज्ञान परंपरेशी (IKS) कसे जोडलेले आहे हे सांगितले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या
डॉ. कल्पना पाटील या होत्या, त्यांनी यावेळी भारतीय विज्ञान आणि कलांची महान परंपरा अधोरेखित केली तसेच भारतीय गणितज्ञांच्या योगदानाचा गौरव केला आणि विद्यार्थ्यांना या विषयाचा सन्मान आणि कुतूहलाने अभ्यास करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मंचावर गणित विभागाच्या विभागप्रमुख डॉ. नलिनी पाटील व डॉ. वंदना भामरे उपस्थित होत्या.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. वंदना भामरे यांनी व्यक्त केले.
या व्याख्यानास गणित विभागातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. व्याख्यानाचा लाभ विभागातील जवळपास 110 विद्यार्थ्यांनी घेतला.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी व विभागातील प्रियंका पाटील ,प्रेरणा सोनवणे व इरफान कुरेशी इत्यादी अध्यापकांनी परिश्रम घेतले.