अमळनेरात आज सुमारे पावणे तीनशे पोलीस तैनात
सीसीटीव्ही व हॅन्ड कॅमेरे यांचीही असणार नजर… अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची माहिती
शहरात सोमवारी पोलिसांचा रूट मार्च संपन्न
अमळनेर : शहराचा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शहरात सुमारे पावणे तीनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असून समाजकंटकांच्या बारीक हालचालींवर सीसीटीव्ही व हॅन्ड कॅमेराचा माध्यमातून नजर ठेवली जाणार असल्याची माहिती सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत चाळीसगाव परीक्षेत्राच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे.
रविवारी एका अफवेने शहरात तणाव निर्माण झाला होता, म्हणून आजही असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सोमवारी शहरात रूट मार्च केला होता, त्या नंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी अनंतचतुर्थीच्या दिवशी केलेल्या नियोजनाची माहिती देत अमळनेरकरांना शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. आज अमळनेर शहरात १ अप्पर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ पोलीस निरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १०० पुरुष पोलीस कर्मचारी, ५० महिला पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे २ प्लाटून, RCP १ प्लाटून आशा सुमारे पावणे तीनशे पोलिसांचा ताफा अमळनेर शहरात आहे, तर अमळनेर शहरावर कॅमेऱ्याची देखील नजर असणार आहे, यात सीसीटीव्ही कॅमेराची मदत घेतली जाणार असून हॅन्ड कॅमेरा देखील मिरवणुकीदरम्यान वापरला जाणार आहे.
दरम्यान यावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये व जनतेने कुठल्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी केले आहे.
आम्ही शहरात पोलीस रूट मार्च केला, शहरात शांतता रहावी हा त्याचा उद्देश आहे. मंगळवारी शहरात आमचा तगडा बंदोबस्त असून जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस दल असे सुमारे पावणे तीनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर सीसीटीव्ही व हॅन्ड कॅमेराच्या माध्यमातून शहरातील सर्व बारीक घडामोडींवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. म्हणून कुणीही कायदा हातात घेऊ नये व जनतेने देखील कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
कविता नेरकर
अप्पर पोलीस अधीक्षक
चाळीसगाव परिक्षेत्र