मराठी साहित्य वाचनाने मानवी जीवन समृद्ध होते… डॉ.फुला बागुल यांचे प्रतिपादन
मराठी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम
अमळनेर : साहित्याने जगणं समृद्ध होते. ज्यांनी ग्रंथांची सोबत ठेवली ते यशस्वी झाले. जेव्हा-जेव्हा नैराश्य येईल, तेव्हा साहित्य मदतीला येते.असे प्रतिपादन एस.पी.डी.एम महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. फुला बागुल यांनी केले. उच्चतर शिक्षा अभियान आणि खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाचे (स्वायत्त), मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जीवनाकडे बघण्याची सकारात्मक भूमिका साहित्य देते.साहित्याने जगात नामांकित व्यक्ती दिलेत.जीवनाला साहित्याने दिशा दिली. जीवन समृद्ध करायचे असेल तर साहित्य वाचले पाहिजे. वाचनाने कुटुंबव्यवस्था विखुरली जात नाही. मराठीतील प्रसिद्ध कवींच्या कवितेचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली.कधीही बाह्यरंगाला महत्त्व देऊ नका,असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळीं विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विजय मांटे यांनी आपले विचार मांडले, ते म्हणाले की,मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आहे. समाजासाठी व राष्ट्रासाठी साहित्य महत्त्वाचे आहे. साहित्य वाचल्याने प्रेरणा मिळते. मराठी भाषा आत्मसात केल्यावर वेग-वेगळ्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी विचार मंचावर मराठी विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर कांबळे उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमात डॉ.रमेश माने,
डॉ.भरतसिंग पाटील, प्रा.नितेश कोचे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ.विलास गावित यांनी करून दिला, तर आभार प्रा.योगेश पाटील यांनी मानले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला मराठी विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.