वासरे गावात घाणीचे साम्राज्य, नागरिकांना आरोग्य धोक्यात
अमळनेर : तालुक्यातील वासरे गाव सध्या घाणीच्या समस्यांनी ग्रस्त झाले आहे. गावकऱ्यांच्या मते, रस्ते आणि गटार पाण्याने भरले असून, स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
याबाबत गावातील गोकुळ हिलाल पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, गावाला घाणीने व्यापले असून, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, नागरिकांना रोजच्या कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाऊस सुरू असल्याने डेंग्यू, टायफाइड आणि मलेरियासारखे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे ग्रामस्थांनी आरोग्याची चिंता व्यक्त केली आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.