मंगरूळ येथे दोन गटात हाणामारी
परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे अमळनेर येथील दोन गटात 29 ऑगस्ट रोजी हाणामाऱ्या झाल्या होत्या. यात दोन्ही गटातील लोक जखमी झाली होते, यातील दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
या बाबत एका गटाकडून दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही मित्रांसह हॉटेल मध्ये जेवणास जात असतांना मंगरूळ येथे आमच्या ओळखीच्या हुसेन खाटीक यांच्या दुकानावर चिकन घेण्यासाठी गेलो होतो, तेथे त्यास भाव विचारला असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. व त्या ठिकाणी असलेल्या सलीम खाटीक याने त्याच्या हातात असलेल्या सुऱ्याने मानेवर वार केला असता फिर्यादिने तो चुकवला व त्याच्या हाताला तो सुरा लागला आहे. तर हुसेन खाटीकने पाठीवर लोखंडी जाडी मारली, यामुळे फिर्यादी जखमी झाला होता. म्हणून तो तेथून जीव वाचवत निघाला व अमळनेर पोलिस ठाण्यात गेला असता तेथून त्याने मेडिकल मेमो घेऊन त्या दिवसापासून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान कामील हुसेन खाटीक, हुसेन खाटीक, सलीम खाटीक यांच्याविरुद्ध सोहित संजय बिऱ्हाडे याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम व भारतीय न्याय संहिता 118(1), 115(2), 352, 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमळनेर उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर हे करीत आहेत.
तर दुसऱ्या गटाने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आधीच्या भांडणातून समझोता होऊनही सोनू बिऱ्हाडे व त्याच्या मित्रांनी मंगरूळ येथे फिर्यादिच्या दुकानावर जाऊन फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला तर त्याच्या मित्रांनी देखील काठ्यांनी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच खिशात असलेले दहा हजार रुपये देखील काढून नेले, या बाबत सोनू बिऱ्हाडेसह सुमारे 8 लोकांवर कामील हुसेन खाटीक याने दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.