प्रेम,अहिंसा,मानवता,समानता, सदाचरण हाच खरा धर्म… धर्म गुरू व अभ्यासकांचे मत
सर्व धर्म परिषद संपन्न … पोलीस प्रशासन व महिला मंच अमळनेर यांचा अभिनव उपक्रम
अमळनेर : अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म परिषदचे आयोजन करण्यात आले. ही परिषद १७ ऑगस्ट रोजी अमळनेर येथे संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत गीत व सर्व धर्मिय प्रार्थना वसुंधरा लांडगे यांनी म्हटले तर महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा मुठे, माजी प्राचार्य डॉ.एल ए पाटील यांच्या सह विचार मंचावर उपस्थित धर्म गुरू व अभ्यासकांनी दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. दीप नमोस्तुते या सुंदर पंक्तीने समारंभाची सुरुवात झाली.
प्रस्तुत समारंभाचे प्रास्ताविक डॉ.अपर्णा मुठे यांनी म्हटले की, अलिकडे समाजात आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह होत आहेत,त्यामुळे एकाप्रकारे नकारात्मकता उत्पन्न होऊन मुलींची हत्या होत आहेत, ते चुकीचे आहे. आपण आपल्या धर्माचे खरे स्वरूप अभ्यासत नाही, त्या मध्ये स्त्री धर्म, पिता धर्म,पुत्र धर्म यांना अधोरेखित केले पाहिजे म्हणून आपण मानवता धर्माचा स्वीकार केले पाहिजे. जागतिक अराजकता पाहता या ठिकाणी अशा नकारात्मक घटना घडू नयेत आणि आपण एक आहोत ही भावना वाढीस लागावी हेच कार्यक्रमाचे प्रयोजन आहे, असे मत व्यक्त केले.
या नंतर वसुंधरा लांडगे यांनी भारतीय संविधानातील उद्देश पत्रिकेचे सर्वांनी पालन करावे असे मत मांडले. तदनंतर जगाला प्रेम देणे हाच खरा धर्म आहे, हे लक्षात घेऊन करुणा व विद्या ताई यांनी खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हे गीत म्हटले.
या प्रसंगी विचारमंचावर जैन मुनि प्रशमनिधीजी म.सा, बोध्द भिक्षू नागसेन खानदेश, ख्रिश्चन गुरू रेव्हरंड विशाल गावित, शीख गुरू संत बाबा धिरज सिंघ, पारशी समाजाचे अभ्यासक केसरी करंजिया, मानवता धर्माचे अभ्यासक डॉ.जयसिंग वाघ, सनातनी हिंदू धर्माचे अभ्यासक वेदमूर्ती भागवतकर अमोल शुक्ल, इस्लाम धर्माचे अभ्यासक मुफ्ती हरून नदवी, बोहरा समाजाचे अभ्यासक मकसूद बोहरा, सिंधी समाजाचे अभ्यासक हरी तोलानी आदी उपस्थित होते.
सर्व प्रथम जैन साध्वी प्रशमनिधीजी म.सा यांनी आपल्या मनोगतात असे म्हटले की, सर्वांचे कल्याण झाले पाहिजे,एका दगडास जसा आकार दिला जातो तशी त्याची उपयुक्तता सिद्ध होते म्हणून जिओ और जिने दो हे जैन धर्माचे मुख्य सूत्र लक्षात ठेवावे. मानवी जीवनाचा उद्देश हा शांती आणि समाधान शोधणे हे आहे म्हणून आपले अस्तित्व व व्यक्तित्व चांगले ठेवावे याचप्रमाणे ईर्ष्या, मुच्या,हिंसेचे त्याग करून अहिंसा परमो धर्म हे तत्व स्वीकृत करणे आवश्यक आहे.
रेव्हरंड विशाल गावित यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, येशू हे प्रेमाचे प्रतिक असून परस्पर चांगले व्यवहार व मान-सन्मानाचे उपदेश करतात तसेच लोकांनी पाहावे यासाठी धर्माचे कार्य महत्वाचे नसून ते निःस्वार्थ असावे यासाठी मन व विचार शुद्ध असणे समाजोपयोगी आहे.आपले बोलणे व वर्तवणूक सारखे असावे, मानवता-क्षमा-प्रेम या प्रकारचा संदेश धर्म देतो.
पारशी समाजाचे अभ्यासक केसरी करंजिया यांनी धर्माचा इतिहास सांगून नव धाम संबंधी माहिती दिली तसेच नैसर्गिक बाबीचा उपयोग कसा केला जातो हे सर्वांच्या लक्षात आणून दिले, हा समाज/धर्म सर्वांसाठी कसा उपयुक्त आहे, या बद्दल नैतिक बाबीवर प्रकाश टाकले.
शीख गुरू संत बाबा धिरज सिंघ यांनी कार्याची सुरुवात ही गुरू नामाने करावे, आपण सर्व एकाच पालकाचे मुलं आहोत असे सांगून सर्व धर्म हे चांगले आहेत फक्त बंधुत्वाची ज्योत पेटविणे आवश्यक आहे, चंगा कोण है,वह है जो गुरू की बात मानते है या बद्दल वास्तव माहिती दिली. शिखांचे १० वे गुरू गोविंद सिंह यांचे उपदेश देशा साठी कसे उपयोगी आहे,हे सांगितले. सर्वांना बरोबरीचा दर्जा दिला असून गुरुद्वारा येथे सर्व धर्माचे लोक येऊ शकतात असे मत व्यक्त केले, तात्पर्य, सर्वांनी सर्व धर्म ग्रंथाचे वाचन करावे,सर्वांचे सन्मान करावे असा उदात्त विचार यावेळी दिले.
बोद्ध भिक्षूक नागसेन खानदेश यांनी सुरुवातीस पाली भाषेतील काही पंक्ती सांगून त्याचे महत्व पटवून दिले. सर्वांचा आदर-सन्मान करणे आज आवश्यक आहे, चांगले विचार व आचरणाने मानव हा सुखी व आनंदी होतो.मानव कल्याण साधताना शोषितांना कसे मुक्त करता येईल ते धर्म आहे,आपण सर्व जण सुमार्गावर आरूढ व्हावे,अहिंसेचा मार्ग स्वीकारावे याचप्रमाणे पुनर्जन्म यावर विश्वास न ठेवता अफाट करुणा व क्षमा, सदाचरणाने वागावे असे सांगताना म्हणाले की, माणूस धर्मासाठी आहे,धर्म माणसासाठी नाही.
मानवता धर्म या बद्दल अभ्यासपूर्ण मत मांडताना डॉ. जयसिंग वाघ म्हणाले की, पहिली धर्म परिषद संकल्पना ही बिहारची आहे. ११२६ वर्षांनी राजा हर्षवर्धन यांनी अनुज(उत्तर प्रदेश) या ठिकाणी सर्व धर्म परिषद घेतली, चिनी प्रवासी युवांग सांग यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न झाली.स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये शिकागो येथिल जागतिक धर्म परिषदेत बंधू-भगिनींनो या शब्दापासून सुरुवात केली हीच विश्व बंधुत्वाची संकल्पना होय, मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे ,आपला धर्म शांततेचा संदेश देतो परंतु हिंसेचे कधिच समर्थन करीत नाही. भारताने विश्व बंधुत्वाची विचारधारा जगाला दिली आहे, एका पाहणीनुसार जगात सर्वात हिंसक जीव असणा-या यादीत मानव हा दुस-या क्रमांकावर आहे, ही विदारक स्थिती बदलणे गरजेचे आहे.
सनातन हिंदू धर्म या बद्दल वेदमूर्ती भागवतकार अमोल शुक्ल यांनी आर्य, अनार्य,धर्म,सनातन या संकल्पनेची अभ्यासपूर्ण मांडणी केली. धर्म ही संकल्पना ही धारण करणारी, जीवन जगण्याची एक रीत वा पद्धत आहे,त्यांनी सनातनी-फारशी-ज्यू या बद्दल सविस्तर माहिती दिली.याचप्रमाणे सहिष्णुता हे सनातनी धर्माचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे, सर्वांशी सलोख्याचे संबंध असावे कारण वसुदैव कुटुंबम हे महत्वाचे आहे.
इस्लाम धर्माचे अभ्यासक मुफ्ती नईद यांनी आपल्या संभाषणात विस्तृतपणे दाखले देऊन समाजापयोगी माहिती दिली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कवी इकबाल यांच्या सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा..या गीताने केले.सध्या देशात अशा सर्व धर्म परिषदेची गरज आहे, स्नेह, बंधुत्व, एकात्मता याची नितांत आवश्यकता आहे. ते पुढे म्हणाले की, सियासती को लहू पीने का लख है,नही तो मूलक में खैरीयत है
प्रेषित मोहम्मद यांचे उदाहरण देऊन ते म्हणतात की, मुझे हिंद से थंडी थंडी हवा आती है,कौन सैतान है जो ईस हवा को गरम कर रहा है.
अशा पद्धतीने शांतीचे संदेश देणारे विचार प्रस्तुत केले.
बोहरा समाजाचे अभ्यासक मोहसीन भाई यांनी हा कार्यक्रम म्हणजे रोल मोडेल ठरावे असे आहे, इस्लाम म्हणजे परमेश्वरास शरण जाणे होय, शांती व प्रेम या वर आधारित हा धर्म आहे, शारीरिक व मानसिक शांती अभिप्रेत असुन यात रोजा हे सर्व इन्द्रियावर ताबा ठेवण्याचे एक साधन आहे असे सांगताना त्यांनी गुनाह करके कहा जाओगे गालिब
हर एक को यहा पर हिसाब देना है
बोहरा समाजात अलिकडे पर्यावरण रक्षणासाठी कार्य सूरु आहेत, या बद्दल सांगितले.आपण कोणावरही उपकाराची जाणीव होऊ देऊ नये, अशा शब्दाने समारोप केले.
आपल्या समारोपीय भाषणात नॅनो साईंटिस्ट व माजी प्राचार्य डॉ. एल ए पाटील यांनी तत्वज्ञान हे कृती शिवाय शून्य आहे असे मत प्रतिपादन केले. डॉ.पाटील पुढे म्हणाले की, सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा विचारातून मानवाने वाटचाल केली पाहिजे. जो पर्यंत मन-बुद्धी – अहंकार – चित्त शुद्ध नाही तो पर्यंत सिद्धांताचे रूपांतर कृतीत होत नाही, जग हे नियमाने चालते आणि नियम(law) हेच महत्वपूर्ण आहे म्हणून सर्वांनी आत्मपरीक्षण केल्यास मानवाचे कल्याण होईल,सर्व विचाराचे गाठोळे हे मन व चित्त आहे ते नियंत्रित असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
प्रस्तुत समारंभाचे आभार कांचन शहा यांनी मानले तर सूत्र संचालन खा.शि.मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी केले.
प्रस्तुत धर्म परिषदेच्या यशस्वीते करिता डॉ. अपर्णा मुठे,सरोज भांडारकर, कांचन शहा यांच्यासह अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलीस स्टेशन येथिल कर्मचारी यांनी प्रयत्न केले तर बजरंग अग्रवाल, सीए नीरज अग्रवाल, देशमाने, डॉ.अविनाश जोशी आदींनी सहकार्य केले.
या प्रसंगी ऍड. ललिता पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. समारंभाचे शेवट वसुंधरा लांडगे यांनी पसायदानाने केले.