अमळनेर तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रे रात्री रामभरोसे!

0
IMG-20261118-WA0013

डॉक्टर कुठे, कर्मचारी कुठे? तालुका आरोग्य अधिकारी गोसावी यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह!

किशोर माळी यांच्या माध्यमातूनच आरोग्य यंत्रणेचा कारभार चालतोय का?

जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज!

 

अमळनेर : ग्रामीण भागातील नागरिकांना रात्रीच्या वेळी अचानक वैद्यकीय समस्या निर्माण झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची व्यवस्था केली आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रात्रीच्या सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मारवड, जानवे, पातोंडा, ढेकू आणि मांडळ या पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी प्रत्यक्ष उपलब्ध असतात का? की आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना केंद्राचे बंद दरवाजे आणि अनुपस्थित कर्मचारी यांचाच सामना करावा लागतो? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

तालुक्यातील या पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळेत डॉक्टर आणि इतर कर्मचारी उपलब्ध नसल्याच्या आमच्या चौकशीत समोर आले आहेत. म्हणून ही बाब केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाची नसून ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर बाब आहे. रात्रीच्या वेळी एखाद्या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या, एखाद्या रुग्णाला अचानक त्रास झाला किंवा अपघात घडला, तर संबंधित रुग्णाने उपचारासाठी नेमके कुठे जायचे? प्राथमिक आरोग्य केंद्रे जनतेच्या सेवेसाठी आहेत की केवळ दिवसा कार्यालयीन कामकाजापुरती मर्यादित आहेत?

या संपूर्ण परिस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी गोसावी यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नियंत्रण, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आरोग्य सेवांचे नियोजन आणि आपत्कालीन व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित आरोग्य प्रशासनाची आहे. मग पाचही केंद्रांमधील रात्रीच्या सेवांची नियमित तपासणी होते का? अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात का? अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई होते का? की कागदोपत्री सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचे दाखवून प्रत्यक्ष परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे? गिरीश गोसावी यांनी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देण्याची वेळ आली आहे.

दुसरीकडे किशोर माळी यांच्या भूमिकेबाबतही आरोग्य विभागात चर्चा सुरू आहे. तालुका आरोग्य अधिकारी जिथे तिथे किशोर माळी दिसतात, त्यांच्या माध्यमातून अनेक कामे होत असल्याचे बोलले जाते. मग तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील नियमित प्रशासकीय यंत्रणा नेमकी कशी कार्यरत आहे? संबंधित अधिकाऱ्यांची कामे आणि जबाबदाऱ्या कोण पार पाडत आहे? किशोर माळी यांच्याकडे नेमक्या कोणत्या अधिकृत जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत? त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाचा फायदा प्रत्यक्ष ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला किती होत आहे? हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.

एखाद्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कार्यालयीन कामे होत असतील, तर त्यात गैर काहीच नाही; मात्र त्याचा परिणाम ग्रामीण आरोग्य सेवांवर होता कामा नये. पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्री डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी असताना कार्यालयीन कामकाजात नेमके कोण व्यस्त आहे आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेकडे कोण लक्ष देत आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

तालुका आरोग्य अधिकारी गोसावी यांनी पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रात्रीच्या ड्युटीचे वेळापत्रक, उपस्थिती नोंदवही, हजेरी, आपत्कालीन सेवा आणि प्रत्यक्ष कर्मचारी उपलब्धतेची माहिती जनतेसमोर ठेवावी. प्रत्येक केंद्रावर रात्रीच्या वेळी कोणता वैद्यकीय अधिकारी आणि कोणता कर्मचारी जबाबदारीवर असतो, त्यांची उपस्थिती कशी तपासली जाते आणि आपत्कालीन रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था काय आहे, याचा खुलासा करावा.

जिल्हा आरोग्य प्रशासनानेही आता केवळ अहवाल मागवून थांबू नये. मारवड, जानवे, पातोंडा, ढेकू आणि मांडळ या पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांची अचानक रात्रीच्या वेळी पाहणी करावी. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती तपासावी आणि गैरहजर आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी. तालुका आरोग्य अधिकारी गोसावी यांच्या नियंत्रणाखालील आरोग्य यंत्रणेचेही मूल्यमापन करावे.

दरम्यान अमळनेर तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी रुग्णसेवेची खात्री कोण देणार? तालुका आरोग्य अधिकारी गोसावी यांचे या केंद्रांवर नियंत्रण आहे की केवळ कागदोपत्री कारभार सुरू आहे? किशोर माळी यांच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाज चालत असेल, तर ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या प्रत्यक्ष सेवेकडे लक्ष कोण देणार? असे सवाल उपस्थित होत आहेत. 

ग्रामीण जनतेला वेळ पाहून आजार होत नाहीत. मग उपचारांसाठी वेळेची मर्यादा का? प्राथमिक आरोग्य केंद्रे रात्रीही रुग्णांच्या मदतीसाठी सक्षम असली पाहिजेत. जनतेच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी.

पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रे रात्री रामभरोसे असतील, तर जबाबदारी नेमकी कोणाची? आता तरी तालुका आरोग्य अधिकारी गोसावी आणि जिल्हा आरोग्य प्रशासन यावर ठोस भूमिका घेणार का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!