प्रताप महाविद्यालयाच्या प्राध्यापक भरतीला प्रशासकीय ब्रेक!
उच्च शिक्षण सहसंचालकांचे महत्त्वपूर्ण पत्र; मुलाखतीसाठी परवानगी नसल्याचे स्पष्ट
विविध तक्रारींसह ‘दिव्य लोकतंत्र’चाही सातत्यपूर्ण पाठपुरावा; भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर!
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेला आता महत्त्वपूर्ण प्रशासकीय वळण मिळाले आहे. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, संभाव्य आर्थिक गैरव्यवहार आणि नियमपालनाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभाग यांनी दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे. या पत्रात मुलाखती आयोजित करण्यासाठी संबंधित कार्यालयाची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दिव्य लोकतंत्रचाही सातत्यपूर्ण पाठपुरावा
प्रताप महाविद्यालयातील प्राध्यापक भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराला आळा बसावा, यासाठी ‘दिव्य लोकतंत्र’नेही या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता.
भरती प्रक्रियेतील मंजुरी, मुलाखतींची पारदर्शकता, उमेदवारांची पात्रता आणि संस्थेच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करून या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुसरीकडे, डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांनीही मुख्यमंत्री कार्यालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शिक्षण संचालक, जिल्हाधिकारी जळगाव आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तक्रार अर्ज पाठवून स्वतंत्र शासकीय देखरेखीची मागणी केली होती.
मुलाखतीसाठी परवानगी नसल्याचे अधिकृत पत्र
खान्देश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष श्री. दिलीप हरखचंद जैन यांना उद्देशून सहसंचालक कार्यालयाने हे पत्र दिले आहे. संस्थेकडून मुलाखती आयोजित करण्याबाबत संबंधित कार्यालयाशी आवश्यक पत्रव्यवहार झालेला नसल्याने मुलाखती घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

३१ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार भरतीचे निर्देश
सदर भरती प्रक्रिया शासन निर्णय दि. ३१ ऑगस्ट २०२६ मधील तरतुदींनुसार पार पाडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेतील आवश्यक मंजुरी, परवानग्या आणि मुलाखतींचे आयोजन यांना प्रशासकीय नियमांचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
उपोषणाचीही दखल
प्रताप महाविद्यालयातील भरती प्रक्रियेच्या संदर्भात दि. ५ नोव्हेंबर २०२६ पासून कार्यालयासमोर उपोषण सुरू असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. संबंधितांना पत्राद्वारे निर्देश दिल्याचे नमूद करून उपोषण मागे घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
आता भरतीचे पुढील भवितव्य काय?
सहसंचालकांच्या पत्रामुळे मुलाखतींच्या आयोजनाबाबतची प्रशासकीय भूमिका स्पष्ट झाली आहे. मात्र, संपूर्ण भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचा स्पष्ट आदेश या पत्रात नाही.
आता खान्देश शिक्षण मंडळ आवश्यक परवानग्या व शासन निर्णयातील अटींची पूर्तता करून भरती प्रक्रिया पुढे नेणार का? मुलाखतींचे आयोजन कोणत्या पद्धतीने होणार? उमेदवारांच्या पात्रतेची आणि गुणांकनाची पडताळणी कशी केली जाणार? या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिव्य लोकतंत्रचा पाठपुरावा, खाशी मंडळाचे माजी कार्याध्यक्ष दिलीप जैन यांनी व डॉ. समाधान मैराळे यांच्या प्रशासकीय स्तरावरील तक्रार आणि सहसंचालक कार्यालयाचे अधिकृत पत्र या घडामोडींमुळे प्रताप महाविद्यालयातील प्राध्यापक भरती प्रक्रिया चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
पारदर्शक भरती, पात्र उमेदवारांना न्याय आणि संस्थेची प्रतिष्ठा अबाधित राहावी, हीच या संपूर्ण पाठपुराव्यामागील भूमिका आहे.
