दुष्काळाच्या नावाखाली वाढदिवसाचा साधेपणा
५१ हजारांच्या मदतीची बोळवणी , मात्र गावभर हजारोंचे बॅनर! अमळनेर बाजार समितीत नेमकं चाललंय तरी काय?
संचालकांच्या नावाने बॅनर, पण काही संचालक म्हणतात ‘आम्हाला विचारलेच नाही’; जवळपास ७५ टक्के संचालक नाराज असल्याची चर्चा!
अमळनेर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी यंदा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्यामार्फत सुपूर्द करण्यात आला. या निर्णयाची प्रसिद्धीही झाली. मात्र, या साधेपणाच्या घोषणेनंतर गावभर झळकलेल्या वाढदिवसाच्या बॅनरनी आता वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे.

एकीकडे दुष्काळाची संवेदना, दुसरीकडे बॅनरचा झगमगाट!
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसावर लाखो रुपये खर्च न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असताना, गावातील विविध ठिकाणी वाढदिवसाचे मोठमोठे बॅनर झळकत असल्याचे चित्र दिसत आहे. या बॅनरवर नेमका किती खर्च झाला? हा खर्च कोणी केला? आणि वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णयाशी या बॅनरबाजीचा मेळ कसा बसतो? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.
५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय केवळ धनादेशापुरता मर्यादित न राहता त्यामागील पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीही महत्त्वाची ठरते. बाजार समितीच्या निधीतून देण्यात आलेल्या मदतीचा उल्लेख करताना ही मदत बाजार समितीची आहे की सभापतींची वैयक्तिक, याबाबतही स्पष्टता असणे आवश्यक आहे.
बॅनरवर संचालकांची नावे; मात्र संचालकच म्हणतात, आम्हाला विचारले नाही!
या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॅनरवरील संचालकांची नावे. काही संचालकांनी आपली परवानगी न घेता किंवा पूर्वकल्पना न देता आपल्या नावाचे वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आल्याचे सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे या बॅनरबाजीमागे नेमकी कोणाची भूमिका आहे, हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो.
जर संचालकांच्या परवानगीशिवाय त्यांची नावे बॅनरवर टाकण्यात आली असतील, तर ही केवळ शुभेच्छांची बाब राहत नाही; तर संचालकांच्या संमतीचा आणि त्यांच्या भूमिकेचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत संबंधित संचालक आणि सभापती अशोक पाटील यांनी आपापली बाजू स्पष्ट करणे गरजेचे आहे.
७५ टक्के संचालक नाराज? शुभेच्छांपासूनही अंतर!
बाजार समितीतील जवळपास ७५ टक्के संचालक नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. विशेष म्हणजे, या संचालकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या नसल्याचे बोलले जात आहे. अर्थात, या नाराजीमागील कारणे आणि संचालकांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. मात्र, बाजार समितीच्या अंतर्गत वातावरणाबाबत या चर्चेमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता सभापती अशोक पाटील यांनी वाढदिवस साधेपणाने करण्याचा निर्णय होता, तर गावभर बॅनरबाजी कशी झाली?, बॅनर लावण्याचा खर्च नेमका कोणी केला?, संचालकांची परवानगी न घेता त्यांच्या नावाचे बॅनर लावण्यात आले का?, संचालकांना माहिती नसेल, तर त्यांच्या नावाचा वापर कोणी केला?, बाजार समितीतील बहुतांश संचालक नाराज असल्याच्या चर्चेत तथ्य आहे का? यांची उत्तर द्यावे!
शेवटी प्रश्न ५१ हजारांच्या मदतीचा नाही, तर घोषणांमधील आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील ताळमेळाचा आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असेल, तर ती केवळ प्रसिद्धीपत्रकातून नव्हे, तर प्रत्येक कृतीतून दिसायला हवी.
कारण जनतेला प्रसिद्धीचे बॅनर नकोत, तर पारदर्शक कारभार आणि प्रामाणिक भूमिका हवी आहे. सभापती अशोक आधार पाटील या प्रश्नांना काय उत्तर देतात, याकडे आता अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.
