साक्ष दिल्याचा राग अन् थेट डंपरखाली चिरडून खून!
नांद्रीत माणुसकीला काळिमा; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा
अमळनेर : अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि पोलिसांसमोर साक्ष देणे एवढीच काय ती चूक! मात्र, याचाच राग मनात धरून एका व्यक्तीला भररस्त्यात वाळूच्या डंपरखाली चिरडून ठार मारल्याची संतापजनक घटना अमळनेर तालुक्यातील नांद्री येथे घडली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास नांद्री बसस्थानकासमोर घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शरद रतन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका साक्षीदाराला धमकी देण्यापासून ते त्याला डंपरखाली चिरडण्यापर्यंतचा घटनाक्रम समोर आल्याने ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांच्या म्हणण्यानुसार, २८ ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टरवरून झालेल्या वादातून विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी, मयूर अनिल बोरसे आणि अन्य एकाने ज्ञानेश्वर व त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी शरद रतन पाटील यांनी साक्षीदार म्हणून भूमिका बजावली होती. याचाच राग मनात धरून विपुल गोसावी याने शरद पाटील यांना रस्त्यावर भेटल्यास चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मात्र, त्यावेळी लोकांनी समजूत घातल्याने शरद यांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती.
दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पाटील यांच्यासह काही जण सावखेडा येथील देव हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. रात्री सुमारे ९:४५ वाजता नांद्री बसस्थानकाजवळ ते थांबले असताना पातोंडा दिशेने राखाडी रंगाची मारुती कार वेगाने आली. या कारमधून विपुल गोसावी, मयूर बोरसे आणि सागर गोसावी खाली उतरले. त्याचवेळी एचआर ३७ डी ८९५७ क्रमांकाचा वाळूचा डंपर तेथे आला. डंपरचालक भरत सुभाष पाटील याने खाली उतरून शिवीगाळ सुरू केली. यावेळी ‘यांना उडवून द्या, चिरडून टाका,’ अशा स्वरूपाचे चिथावणीखोर शब्द वापरण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत आहे.
त्यानंतर डंपर वेगाने पुढे नेण्यात आला. विपुल आणि मयूर यांनी शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलल्याचा, तर सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. डंपरचालक भरत याने शरद यांच्या अंगावर वाहन घातल्याने त्यांचे दोन्ही पाय गंभीररीत्या चिरडले गेले. घटनेनंतर चौघेही घटनास्थळावरून फरार झाले. जखमी शरद यांना १०८ रुग्णवाहिकेने अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने धुळे रवाना करण्यात आले; मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासचक्र फिरवत दहिवद फाटा-पिंपळी मार्गे पळून जाणारा डंपर बुधगाव येथे पकडण्यात आला. डंपरचालक भरत पाटील याला रात्रीच अटक करण्यात आली असून, अन्य तीन आरोपी फरार आहेत.

या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुन्ह्याच्या तपासात साक्ष देणाऱ्या व्यक्तीलाच धमकी दिली जात असेल आणि त्यानंतर त्याच व्यक्तीला भररस्त्यात डंपरखाली चिरडून मारल्याचा आरोप होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी पुढे कसे यायचे? साक्षीदारांना धमक्या देणाऱ्यांवर वेळीच कारवाई का झाली नाही? वाळू वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
केवळ डंपर जप्त करून आणि चालकाला अटक करून प्रकरण संपणार नाही. फरार आरोपींना तातडीने अटक करून कथित कटाचा सखोल तपास करणे, साक्षीदारांना संरक्षण देणे आणि या घटनेमागील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. अन्यथा कायद्याची भीती संपली असून दहशतीच्या बळावर न्यायाचा आवाज दाबला जात असल्याचा संदेश समाजात जाईल.
ज्ञानेश्वर गोसावी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १०३(१), १०९, ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत. साक्ष देणे हा गुन्हा नाही; मात्र साक्षीदाराचा जीव घेण्याचा आरोप होणे ही संपूर्ण समाजव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. नांद्रीतील या घटनेत दोषींना कठोर शिक्षा मिळणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
