कार्यकर्ते गेले चुलीत, सगळी पदे घरीच!
कार्यकर्त्यांनी किती दिवस सतरंज्याच उचलायच्या?
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला
जळगाव : राजकारणात कार्यकर्ता हा पक्षाचा खरा कणा असतो. नेत्यांच्या सभांना गर्दी जमवण्यापासून ते निवडणुकीच्या प्रचारापर्यंत, पक्षाच्या विजयासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा कार्यकर्ता मात्र पदवाटपाच्या वेळी दुर्लक्षित होत असेल, तर ही राजकारणातील मोठी शोकांतिका आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. आमदार आणि इतर राजकीय पुढाऱ्यांच्या घरातील व्यक्तींनाच उमेदवारी मिळत असल्याची चर्चा आहे. त्यात तीन जणांचे नातेवाईक बिनविरोध झाल्याने राजकीय घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
प्रश्न असा आहे की, वर्षानुवर्षे पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्या, झेंडे वाहणाऱ्या, नेत्यांच्या सभा यशस्वी करणाऱ्या आणि निवडणुकीत जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेमके काय करायचे?
नेत्यांच्या घरातील व्यक्तींना संधी मिळण्यास विरोध नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र, सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी संधीची दारे कधी उघडणार? केवळ राजकीय आडनाव आणि कौटुंबिक संबंध यांनाच महत्त्व मिळणार असेल, तर कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे मोल काय?
सभा भरवायला कार्यकर्ता, प्रचार करायला कार्यकर्ता, मतदारांच्या दारात जायला कार्यकर्ता; पण पद आणि उमेदवारीची वेळ आली की नेत्यांच्या घरातीलच व्यक्ती पुढे! ही कसली पक्षांतर्गत लोकशाही?
प्रत्येक पक्षात असे अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी कठीण काळात पक्षाची साथ सोडलेली नाही. पराभव झाला तरी ते पक्षासोबत राहिले, विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आणि संघटना मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली. मात्र, त्यांना प्रत्येक वेळी ‘पुढच्या वेळी संधी देऊ’, ‘तुमचा विचार करू’ अशा आश्वासनांवरच समाधान मानावे लागते.
निष्ठा म्हणजे गुलामगिरी नाही. पक्षासाठी काम करणे म्हणजे स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा आणि आत्मसन्मानाचा त्याग करणेही नाही. कार्यकर्त्यालाही नेतृत्व करण्याची इच्छा असते, समाजासाठी काम करण्याची क्षमता असते. मग त्याला संधी देताना दुजाभाव का?
जिल्हा बँक ही केवळ राजकीय प्रतिष्ठेची संस्था नाही. तिचा संबंध शेतकरी, सहकार क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या संस्थांमध्ये राजकीय वारशापेक्षा अनुभव, पात्रता, पारदर्शकता आणि जनहिताला प्राधान्य मिळाले पाहिजे.
बिनविरोध निवडून येणे चुकीचे नाही; मात्र उमेदवारीची प्रक्रिया पारदर्शक होती का? इतर इच्छुकांना समान संधी मिळाली का? पात्र कार्यकर्त्यांचा विचार झाला का? हे प्रश्न विचारले जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
कार्यकर्त्यांनो, आता सतरंज्या उचलण्यापलीकडे विचार करा!
आता कार्यकर्त्यांनी केवळ नाराजी व्यक्त करून चालणार नाही. संघटितपणे आपले प्रश्न मांडले पाहिजेत. पक्षातील उमेदवारी प्रक्रिया पारदर्शक असावी, पात्र कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि निर्णयप्रक्रियेत सामान्य कार्यकर्त्यालाही स्थान मिळावे, यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवला पाहिजे.
नेत्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कारण पक्ष मोठा होतो तो केवळ आमदार, खासदार किंवा मंत्र्यांमुळे नाही, तर तळागाळात काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे!
दरम्यान नेत्यांच्या घरातच सगळी पदे जाणार असतील, तर कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे उचलायचे, सतरंज्या टाकायच्या आणि निवडणुकीच्या वेळी गर्दी जमवायची का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कार्यकर्त्यांनो, आता जागे व्हा! आपल्या हक्कांसाठी संघटित व्हा! निष्ठा जरूर जपा, पण आत्मसन्मान गमावू नका. कारण राजकारणात नेत्यांची घरे मोठी होण्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्यांचे कर्तृत्व मोठे होणे अधिक महत्त्वाचे आहे!
