७० हजारांच्या विषयात चौकशी का नाही?
६०-४० पॅटर्न आड येतोय की काय? अमळनेरमध्ये चर्चांना उधाण!
अमळनेर : पिटाचा धाक दाखवून सुमारे ७० हजार रुपये उकळल्याची चर्चा सुरू झाली, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दूरध्वनीद्वारे तक्रारीही झाल्या, ‘दिव्य लोकतंत्र’च्या माध्यमातून व्यंगचित्रांच्या फटकाऱ्यांनीही लक्ष वेधले; मात्र अद्याप चौकशी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मग या प्रकरणात चौकशीची गाडी नेमकी अडली कुठे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सामान्य प्रकरणांत तक्रारीची दखल घेण्यापासून तपासापर्यंत यंत्रणा तत्पर असते, अशी अपेक्षा असते. मग या कथित ७० हजारांच्या प्रकरणात चौकशीचा मुहूर्त अद्याप का निघालेला नाही? तक्रारींची दखल घेतली गेली आहे का? चौकशी सुरू असेल तर तिची प्रगती काय? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
या प्रकरणात ‘६०-४० पॅटर्न’चा काही संबंध आहे का, असा उपरोधिक सवालही चर्चेत आहे. कारण चौकशीच होत नसेल, तर संशयाचे ढग दूर कसे होणार, हा खरा प्रश्न!
ज्यांच्या हाती ससा, तेच शिकारी?
‘ज्यांच्या हाती ससा, तेच शिकारी!’ अशी म्हण आठवावी, अशी परिस्थिती असल्याची मिश्किल चर्चा रंगू लागली आहे. तक्रार वरिष्ठांकडे केली, तर त्या तक्रारीवर पुढे नेमकी कोणती कार्यवाही झाली, याची माहिती मिळणे अपेक्षित आहे. तक्रारीची दखल घेणारी यंत्रणाच या प्रकरणात चौकशी करणार असेल, तर पारदर्शकतेसाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार का, असाही सवाल उपस्थित होत आहे.
आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच हिशेब स्पष्ट करावा!
कथित ७० हजारांच्या प्रकरणात नेमके काय घडले, तक्रारींची दखल घेतली का आणि चौकशी झाली असल्यास तिचे निष्कर्ष काय, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. आरोप खरे की खोटे, हे चर्चेने नव्हे तर निष्पक्ष चौकशीनेच ठरणार आहे.
दरम्यान ७० हजारांच्या प्रकरणात चौकशी कधी? आणि ‘६०-४० पॅटर्न’ हा केवळ चर्चेचा विषय आहे, की त्यामागे काही तथ्य आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
