अमळनेर रेल्वे स्थानकावर अपघातात जखमी महिलेचा मृत्यू; खान्देशातील आरोग्य यंत्रणेवर नातेवाइकांचा संताप

0
IMG-20261027-WA0019

धुळे जिल्हा रुग्णालयात न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्याने पुढील उपचारांसाठी हलविले होते सुरतला….

 

अमळनेर : सुरत येथून अमळनेरला येत असताना रेल्वे स्थानकावर घाईघाईत रेल्वेतून उतरताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रत्नाबाई राजेंद्र पाटील (वय ५२, रा. गडखांब -मांजर्डी , ता. अमळनेर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना पुढील उपचारांसाठी सुरत येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, खान्देशातील आरोग्य यंत्रणेच्या सुविधांवरून नातेवाइकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नाबाई पाटील या सुरत येथून अमळनेरला येत होत्या. अमळनेर रेल्वे स्थानकावर रेल्वेतून घाईघाईत उतरत असताना त्यांचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अमळनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारांसाठी धुळे येथे हलविण्यात आले.

मात्र, धुळे जिल्हा रुग्णालयात न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना सुरत येथे नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. एका अपघातानंतर गंभीर जखमी महिलेवर वेळेत आवश्यक उपचार मिळविण्यासाठी नातेवाइकांना करावी लागलेली धावपळ या घटनेतून समोर आली आहे.

 

खान्देशातील आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह

 

धुळे जिल्हा रुग्णालयात न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरून मृत महिलेच्या नातेवाइकांनी खान्देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गंभीर रुग्णांना उपचारांसाठी सुरतसारख्या दूरच्या शहरात हलवावे लागत असेल, तर स्थानिक पातळीवरील आरोग्य सुविधांचा उपयोग काय, असा सवाल या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.

गंभीर जखमी रुग्णांना वेळेत तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णांना अन्य शहरांमध्ये हलविण्याची वेळ येत असल्याने खान्देशातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

रत्नाबाई पाटील यांच्या मृत्यूमुळे गडखांब गावासह अमळनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने गंभीर रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!