२४ तासांत तीन वेगवेगळ्या दुर्घटना; तिघांचा मृत्यू
अमळनेर तालुक्यावर शोककळा
अमळनेर : तालुक्यात अवघ्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी रात्री सुरू झालेल्या या दुर्घटनांची मालिका सोमवारी रात्रीपर्यंत सुरू राहिली.
रविवारी रात्री सुमारे ८ वाजता प्रताप महाविद्यालयाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर अपघात झाला. या दुर्घटनेत अमळनेर येथील विजय भार्गव यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, सोमवारी दुपारी एकरुखी येथील राजू बाळू भिल हे चिखली नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना ते नदीतील गाळात फसले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने नदीत शोध घेत त्यांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने एकरुखी परिसरात शोककळा पसरली.
यानंतर सोमवारी रात्री आणखी एक दुर्दैवी घटना घडली. जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्णवाहिका चालक अर्जुन लोखंडे हे कर्तव्यावर जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सलग २४ तासांत घडलेल्या या तीन घटनांमुळे अमळनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तीन कुटुंबांवर एकाच काळात दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्घटनांनी संपूर्ण तालुक्याचे वातावरण शोकमय झाले आहे.
